20 टक्क्यांपेक्षा अधिक इथेनॉल वापरण्याचा विचार
मंत्री हरदीपसिंग पुरी यांची माहिती
वृत्तसंस्था/ दिसपूर
भारत पेट्रोलमध्ये इथेनॉलचे 20 टक्क्यापेक्षा अधिक मिश्रण करण्याच्या दिशेने विचार करत असल्याचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायु मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी म्हटले आहे. 20 टक्क्यांपेक्षा अधिक इथेनॉल मिश्रणासाठी निती आयोगांतर्गत 1 समिती स्थापन करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अॅडव्हांटेज आसाम 2.0 व्यापार शिखर संमेलनामध्ये ते बोलत होते. भारताने इथेनॉल मिश्रणाच्या बाबतीत 19.2 टक्के हे प्रमाण साध्य केले आहे. यापुढे आता 20 टक्क्यांहून अधिक इथेनॉलचे प्रमाण पेट्रोलमध्ये वाढविण्यासाठी विचार केला जात आहे. निती आयोगाच्या समुहांतर्गत एका समितीची स्थापना करण्यात आली असून वाढीव मिश्रणाबाबत सर्वार्थाने विचार केला जाणार आहे. या शिखर संमेलनामध्ये स्टार सिमेंट या कंपनीने आसाममध्ये आपल्या प्रकल्पासाठी 3200 कोटी रुपये गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने राज्य सरकार सोबत सहकार्याचा करार केला असून त्यावर स्वाक्षरी झाल्या आहेत.