For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

31 डिसेंबरला पार्ट्या करताना शेतकऱ्यांचा विचार करा!

09:34 AM Dec 30, 2023 IST | Tarun Bharat Portal
31 डिसेंबरला पार्ट्या करताना शेतकऱ्यांचा विचार करा
Advertisement

शिवारातील प्लास्टिक, काचेच्या बाटल्यांबाबत त्रास होणार नाही याची काळजी घ्या

Advertisement

बेळगाव : यावर्षी 31 डिसेंबर रविवारी आला आहे. त्यामुळे सारेच पार्ट्यांचा बेत आखू लागले आहेत. शहरापासून जवळ असलेल्या शिवारामध्ये तसेच ग्रामीण भागातील तरुणही शिवारामध्ये पार्ट्या करत असतात. मात्र हे करत असताना प्लास्टिकचे ग्लास, काचेच्या बॉटल्स त्या शिवारातच फेकून देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. दरवर्षी हा प्रकार घडत आहे. तेंव्हा तरुणांनी पार्ट्या जरी केल्या तरी प्लास्टिक ग्लास, काचेच्या बाटल्या तसेच इतर सर्व वस्तू शिवारातून आणून कचरापुंडामध्ये टाकाव्यात, असे आवाहन शेतकऱ्यांनी केले आहे. सध्या प्लास्टिकचे युग आले आहे. त्यामुळे चैनबाज असलेले तरुण शिवारातच पार्ट्यांचे आयोजन करत आहेत. त्यावेळी प्लास्टिकचे ग्लास, बॉटल, शिवारामध्ये फेकून देत आहेत. काचेच्या बॉटल असतील तर त्या फोडल्याही जात आहेत. वारंवार शिवारामध्ये पार्ट्यांचे आयोजन केले जात असते. याचबरोबर आता 31 डिसेंबर रविवारी आल्यामुळे आणखी त्याला पेव फुटणार आहे. मात्र या प्रकारामुळे शेतकरी अक्षरश: हैराण झाले आहेत. तेव्हा पार्ट्या करणाऱ्या तरुणांनी शेतकऱ्यांना त्रास होवू नये यासाठी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

शिवारामध्ये तरुण पार्ट्या आयोजन करताना दारू ढोसत आहेत. सिगारेटदेखील ओढून तेथेच टाकून देत आहेत. त्यामुळे बऱ्याचवेळा गवतगंजींना आगदेखील लागत आहे. जुगारदेखील जोरात सुरू असतो. तर काही तरुण गांजा पिऊन भांडणे काढण्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महिलावर्ग तर शेतीकडे जाणेदेखील अवघड झाले आहे. तेव्हा किमान शेतकऱ्यांची अवस्था पाहून तरी तरुणांनी त्यांना साहाय्य करावे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. महत्त्वाचे म्हणजे दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्यातच अशा प्रकारांमुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तेव्हा याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. पार्ट्यांमुळे भटक्या कुत्र्यांचा वावरही शिवारात होत आहे. कुत्र्यांच्या त्रासालाही शेतकरी कंटाळले आहेत. कुत्र्यांचे कळप शेतामध्ये जाऊन ठाण मांडून बसत आहेत. पार्ट्या झाल्यानंतर टाकलेले अन्न तसेच इतर वस्तू खाण्यासाठी कुत्र्यांचा कळप जमा होत असतो. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. सध्या कडधान्य पीक शिवारामध्ये आहे. त्या कडधान्य किंवा इतर पिकांमध्ये कुत्र्यांचे कळप ठाण मांडून बसत आहेत. एकूणच शेतकरी या प्रकाराने हैराण झाला आहे. आता 31 डिसेंबर असून पुन्हा पार्ट्यांचा पेव वाढणार आहे. तेव्हा अतिउत्साही तरुणांनी आवर घालावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.