ठिकपुर्लीची बर्फी पोहोचली 20 देशांत; 50 कुटुंबांना रोजगार; चार दशकांच्या मेहनतीतून उभा राहिला गोड व्यवसाय; महाराष्ट्रासह विदेशातही चवीची मोहिनी
ठिकपुर्लीमध्ये बर्फी व्यवसायाची सुरुवात 1980 च्या दशकात झाली. सुरुवातीच्या काळात व्यवसाय उभा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ग्राहकांपर्यंत बर्फीची चव पोहोचवण्यासाठी सुरुवातीच्या विक्रेत्यांनी मोफत बर्फी वाटली. हळूहळू ग्राहकांचा प्रतिसाद वाढला आणि व्यवसायाला चालना मिळाली. आज फ्रान्स, जर्मनी, दुबई, अमेरिका, दक्षिण कोरिया आणि इंग्लंडसह विविध देशांत ठिकपुर्लीच्या बर्फीची मागणी असल्याचे व्यावसायिक सांगतात. दिल्ली आणि दक्षिण भारतातही या बर्फीला मोठी पसंती मिळत आहे.
पारंपरिक पद्धतीतून खास चव
ठिकपुर्लीच्या बर्फीचे वैशिष्ट्य म्हणजे तिचा कणीदार पोत आणि पारंपरिक बनवण्याची पद्धत. म्हशीच्या दुधापासून खवा तयार करून त्यात साखर मिसळली जाते. पहाटे पाच वाजल्यापासून दूध संकलनाला सुरुवात होते. गावोगावी जाऊन म्हशीच्या गोठ्यांमधून दूध गोळा केले जाते. सुमारे 15 लिटर दूध आणि दोन किलो साखरेपासून तयार होणाऱ्या एका आदणाला जवळपास दोन तास लागतात. यातून सुमारे साडेचार किलो बर्फी तयार होते. योग्य प्रमाण, सातत्याने ढवळणे आणि आचेवर नियंत्रण ठेवणे यामुळे बर्फीचा विशिष्ट पोत आणि चव टिकून राहते.
दिवसाला हजारो नगांची निर्मिती
सुरुवातीला संपूर्ण गावात दिवसाला 400 ते 500 नग बर्फी तयार होत होती. आज प्रत्येक व्यावसायिक दिवसाला साधारण एक ते दीड हजार नगांची निर्मिती करतो. काही व्यावसायिक दिवसाला जवळपास 40 किलो बर्फी तयार करतात. वाढती मागणी लक्षात घेता अनेकदा उपलब्ध बर्फी अपुरी पडते. पूर्वी एक रुपयाला विकली जाणारी बर्फी आज साधारण 15 रुपयांना विकली जाते.
आदमापूर येथील तीर्थक्षेत्र आणि कोकणाकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या ठिकपुर्लीत प्रवासी, भाविक आणि पर्यटक बर्फी खरेदीसाठी थांबतात. अधिकृत कागदपत्रांत 'बर्फीचे गाव' असा उल्लेख नसला, तरी चव, गुणवत्ता आणि एकजुटीच्या जोरावर ठिकपुर्लीने ही ओळख निर्माण केली आहे.
45 ते 50 कुटुंबांचा उदरनिर्वाह
ठिकपुर्लीतील जवळपास 45 ते 50 कुटुंबांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून आहे. दूध संकलन, निर्मिती, पॅकिंग, वाहतूक आणि विक्री अशा विविध कामांतून रोजगार निर्माण झाला आहे. या व्यवसायामुळे अनेक कुटुंबांच्या उत्पन्नाला आधार मिळत असून गावाच्या अर्थव्यवस्थेलाही बळ मिळाले आहे.
1983 मध्ये गावात बर्फी विक्रीला सुरुवात झाली. सुरुवातीला बर्फीची चव लोकांना समजावी म्हणून मोफत बर्फी खायला दिली. त्यातूनच आज गावातील जवळपास 50 कुटुंबे या व्यवसायावर उदरनिर्वाह करत आहेत, असे बर्फी विक्रेते प्रवीण मळगे यांनी सांगितले.
आमची बर्फी विदेशापर्यंत पोहोचल्याचा अभिमान वाटतो. एका दुकानातून दिवसाला 1200 नग बर्फी विकली जाते. सणासमारंभ आणि विविध कार्यक्रमांसाठी ठिकपुर्लीतूनच बर्फी खरेदी केली जाते, असे बर्फी विक्रेते शहाजी चौगुले यांनी सांगितले.
एका छोट्या गावाच्या मेहनतीतून उभा राहिलेला हा व्यवसाय आज ठिकपुर्लीच्या नावाला जागतिक स्तरावर पोहोचवणारी गोड ओळख ठरला आहे.
