भामट्यांकडून वृद्धेच्या अंगावरील पावणेतीन लाखांचे दागिने लंपास
कोतवाल गल्ली येथील घटना, मार्केट पोलिसात गुन्हा दाखल
बेळगाव : सेट नामक एका व्यक्तीला दोन मुलीनंतर मुलगा झाल्याने गरिबांना गिफ्ट दिले जाणार आहे, त्यामुळे तुमच्या अंगावरील दागिने काढून पर्समध्ये ठेवा, असे सांगत 75 वर्षीय वृद्धेच्या अंगावरील सुमारे 2 लाख 75 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम दोघा भामट्यांनी पळविली आहे. या प्रकरणी सोमवार दि. 17 रोजी शहाजदबी अख्तरशा मकानदार (वय 75) रा. बुडा स्किम नंबर 13, टी. व्ही. सेंटर यांनी मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलिसांनी तिघा भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करून घेत तपास चालविल ा आहे.
फिर्यादी शहाजदबी या बॉक्साईट रोड, टीव्ही सेंटर येथे राहणाऱ्या असून त्या दैनंदिन साहित्य खरेदी करण्यासाठी केएसआरटीसी (सीबीटी) बसच्या माध्यमातून बेळगाव कोतवाल गल्लीला ये-जा करत होत्या. त्याचप्रमाणे सोमवार दि. 17 रोजी सकाळी 10.30 च्या दरम्यान खरेदीसाठी म्हणून त्या अजम सर्कल येथून सीबीटी बसमधून सकाळी 11 वा. सीबीटी बसस्थानकात आल्या. त्यानंतर तेथून कोतवाल गल्लीकडे जात असताना अंदाजे 30 ते 35 वर्षीय दोघे भामटे त्यांच्याजवळ आले. दोघांनी शहाजदबी यांना गाठले व त्यांच्या अंगावरील दागिने पळविण्याच्या उद्देशाने त्यांच्याशी गप्पा गोष्टी करण्यास सुरुवात केली.
शहा नामक व्यक्तीला दोन मुलीनंतर मुलगा झाला आहे. या खुशीने गरिबांना गिफ्ट दिले जाणार आहे, त्यामुळे तुमच्या अंगावरील दागिने व पैसे पर्समध्ये ठेवण्यास सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून शहाजदबी यांनी 40 हजार रुपये किमतीचे 5 ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे रिंग, 4 ग्रॅम वजनाची 35 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, दोन लाख रुपये किमतीच्या 4 तोळे 25 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या व 600 रुपयांची रोकड असा एकूण 2 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज काढून दिला. भामट्यांनी सदर दागिने व रोकड पर्समध्ये ठेवली. सदर पर्स शहाजदबी यांच्या बॅगमध्ये ठेवल्याचे भासविले व इथेच बसा आपण येतो, असे सांगून भामट्यांनी तेथून पलायन केले.
बराच उशीर झाला तरी भामटे परतले नाहीत. बॅग उघडून पाहिले असता त्यामध्ये दागिने ठेवलेली पर्स नसल्याची त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी मार्केट पोलीस स्थानक गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी दोघा अज्ञात भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करून तपास चालविला आहे. भामट्यांचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे.