For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

न्यू वंटमुरीतून चोरट्यांनी पळविले एटीएम मशीन

12:43 PM Dec 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
न्यू वंटमुरीतून चोरट्यांनी पळविले एटीएम मशीन
Advertisement

मशीन फोडणे शक्य न झाल्याने रस्त्याच्या कडेला फेकून पलायन : एका मोटारसायकलचीही चोरी

Advertisement

बेळगाव : न्यू वंटमुरी गावातील इंडिया वन कंपनीचे एटीएम मशीन चोरट्यांनी उचकटून नेल्याची खळबळजनक घटना मंगळवार सकाळी उघडकीस आली आहे. गावापासून काही अंतरावर  महामार्गालगत असलेले एटीएम गॅस कटर व इतर साहित्याच्या माध्यमातून फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र प्रयत्न अयशस्वी ठरल्याने चोरट्यांनी तेथेच एटीएम मशीन फेकून देऊन पलायन केले. इतकेच नव्हे तर चोरट्यांनी चोरलेली एक मोटारसायकलदेखील उक्कड गावानजीक सोडून देण्यात आली. घडलेल्या या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी संजय यल्लाप्पा पाटील रा. कंग्राळी बुद्रुक यांनी काकती पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांतून समजलेली अधिक माहिती अशी, न्यू वंटमुरी गावातील सर्व्हिस रस्त्यानजीक इंडिया वन या कंपनीचे एटीएम आहे. रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने एटीएम सेवा पुरविणाऱ्या कंपनीने गावात दुसऱ्या ठिकाणी एटीएम बसविले आहे. काही दिवसांतच जुने एटीएम बंद केले जाणार होते. त्यामुळे तेथील अलार्म व्यवस्था बंद ठेवण्यात आली होती. चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्री 3 च्या दरम्यान सर्व्हिस रस्त्याजवळील एटीएम फोडण्याच्या उद्देशाने तोंडावर मास्क घालून आत प्रवेश केला. त्यानंतर तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा रंगाचा स्प्रे मारून आपली छबी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली.

Advertisement

त्यानंतर एटीएम बसविण्यात आलेल्या फौंडेशनचे नटबोल्ट उचकटून एटीएम मशीन एका हातगाडीवर ठेवून गावापासून 2 किलोमीटर अंतरापर्यंत नेले. महामार्गालगत निर्जनस्थळी गेल्यानंतर गॅस गटर व इतर साहित्याचा उपयोग करून एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण त्यांना यश न आल्याने शेवटी चोरट्यांनी चोरलेले एटीएम मशीन तेथेच फेकून देऊन पलायन केले. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर काकती पोलिसांना माहिती देण्यात आली. लागलीच पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ नाईक व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत स्वत: पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनीदेखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी करण्यासह माहिती जाणून घेतली.

तिघे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

परिसरातील कॅमेरे तपासून पाहिले असता तिघे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. मात्र त्यांनी तोंडावर मास्क घातल्याने चेहरे ओळखणे अशक्य झाले आहे. एटीम संदर्भात सेवा पुरविणाऱ्या कंपनीने कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतलेली नाही. अलार्म व्यवस्था बंद असून सुरक्षा रक्षकही नव्हता. त्यामुळेच ही घटना घडली असल्याचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. याबाबत संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून चौकशी करणार असल्याचेही ते म्हणाले. सदर एटीएम मशीनमध्ये 1 लाख रुपयांची रोकड होती असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुऊ केला आहे.

Advertisement
Tags :

.