खानापूर बसस्थानक परिसरात चोरांचा सुळसुळाट
गर्दीचा फायदा घेऊन चोरीच्या प्रकारात वाढ : नागरिकात भीती
वार्ताहर /नंदगड
खानापूर बस आगार व हेस्काम कार्यालयाजवळील बस थांब्यावरून बसमध्ये चढणाऱ्या प्रवासी वर्गांचे खिसे कापून रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने पळवण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. अलीकडे महिलांसाठी बस प्रवास मोफत असल्याने मोठ्या प्रमाणात महिला बसमधून प्रवास करताना दिसत आहेत. याच गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्dयातील सोन्याचे दागिने लंपास करण्याचे प्रकार घडत आहेत. शिवाय पर्स कापून त्यातील रक्कम चोरली जात आहे. पुरुषांच्या पॅन्टचे खिसे कापले जात आहेत. बाजारात भाजीपाला व अन्य साहित्य खरेदीत गुंतलेल्या लोकांच्या खिशातील मोबाईल चोरण्याचे प्रकारही घडत आहेत. काही लोक चोरी संबंधी पोलिसात तक्रार करतात. तर काही विनाकारण व्याप नको म्हणून गप्प बसतात.
चन्नेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक आर. डी. पाटील हे शनिवारी एका लग्नानिमित्त खानापूरला आले होते. लग्न आटोपून खानापूरहून बसने नंदगडपर्यंत आले. दरम्यानच्या काळात त्यांच्या पॅन्टचा एक खिसा कापण्यात आला होता. या खिशामध्ये पाचशे रुपयांच्या दहा नोटा होत्या. खिसा कापण्यात आला. परंतु त्या खिशातील नोटा मात्र लांबवण्यात चोर अयशस्वी ठरले. घरी जाऊन पाहताच खिसा कापण्यात आला असल्याचे पाटील यांच्या निदर्शनास आले. पाचशेच्या दहाही नोटा ब्लेडमुळे कापल्या होत्या. परंतु त्या तशाच खिशामध्येच एका कडेला राहिल्या. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान टळले. यापुढे अशा घटना होऊ नये यासाठी जनतेने सतर्क राहणे गरजेचे आहे. अशा चोराना पकडण्यात पोलिसांनी आपली कामगिरी चोख बजावणे तितकेच गरजेचे असल्याचे मत जनतेतून व्यक्त होत आहे.