महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शिंदोळी येथे चोरट्यांकडून महिलेचा विहिरीत ढकलून खून?

12:34 PM Sep 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मंदिरात चोरी करताना पाहिल्याने खून केल्याचा संशय : गूढ घटना

Advertisement

बेळगाव : बेळगाव शहर व तालुक्यातील वेगवेगळ्या मंदिरांतील चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. शिंदोळी येथील मसणाई मंदिरात चोरी झाली असून याच परिसरातील एका महिलेचा मृतदेह मंदिराजवळील विहिरीत आढळून आला आहे. त्यामुळे चोरट्यांनी या महिलेचा खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारी सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेने एकच खळबळ माजली आहे. भारती कानाप्पा पुजेरी (वय 48) रा. होसकेरी गल्ली, शिंदोळी असे त्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. भारती यांचा मुलगा आनंद कानाप्पा पुजेरी याने दिलेल्या फिर्यादीवरून मारिहाळ पोलीस स्थानकात संशयास्पद मृत्यू प्रकरणाची नोंद झाली आहे. पोलीस निरीक्षक गुरुराज कल्याणशेट्टी, उपनिरीक्षक मंजुनाथ नायक आदी अधिकारी याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत. भारती यांच्या घराजवळच मसणाई मंदिर आहे. मसणाई मंदिरात चोरीचा प्रकार घडला आहे.

Advertisement

चोरट्यांनी मंदिरातील चांदीचे दागिने व साहित्य पळविले आहे. यासंबंधीही मारिहाळ पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला आहे. या मंदिराजवळच सागर मुचंडी यांच्या शेतजमिनीतील विहिरीत भारती यांचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे मंदिरातील चोरीचा प्रकार पाहिल्यामुळे चोरट्यांनी भारती यांना विहिरीत ढकलले का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गुरुवार दि. 26 सप्टेंबर रोजी पहाटे 5 वाजता भारती आपल्या दैनंदिन कामात गुंतल्या होत्या. जनावरांचा गोठा स्वच्छ करून गायरीत शेण टाकण्यासाठी त्या घराबाहेर आल्या होत्या. त्यानंतर सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास मंदिराच्या पाठीमागे जमिनीशी समांतर असलेल्या विहिरीत त्यांचा मृतदेह दिसला. त्यामुळे कुटुंबीय व गावकरी घटनास्थळी जमा झाले. मारिहाळ पोलिसांना पाचारण करण्यात आले.

अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने भारती यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला आहे. त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात त्यांच्या मृतदेहावर उत्तरीय तपासणी करण्यात आली. शवचिकित्सा अहवाल उपलब्ध झाल्यानंतरच या प्रकरणातील गूढ उकलता येणार आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. गायरीत शेण टाकण्यासाठी गेलेली भारती परतली नाही. त्यावेळी कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. मसणाई मंदिरासमोर शेणाची बुट्टी पडली होती. विहिरीजवळ चप्पल पडल्या होत्या. त्यामुळेच जाता जाता चोरट्यांनी विहिरीत ढकलून या महिलेचा खून केल्याचा संशय बळावला आहे.

शवचिकित्सा अहवाल उपलब्ध झाल्यानंतरच घटनेचा उलगडा होणार 

गेल्या पंधरवड्यात बेळगाव शहर व तालुक्यातील चार मंदिरे फोडण्यात आली आहेत. शिंदोळी येथील पाचव्या मंदिरात चोरी झाली आहे. गोठ्यातील शेण गायरीत टाकण्यासाठी पहाटे घराबाहेर आलेल्या महिलेने चोरट्यांना पाहिले असावे. त्यामुळे त्यांनी तिला विहिरीत ढकलले असावे, असा संशय आहे. चोरट्यांचा पाठलाग चुकविण्यासाठीच्या धावपळीत ती विहिरीत पडली असणार, असाही संशय आहे. शवचिकित्सा अहवाल उपलब्ध झाल्यानंतरच याचा उलगडा होणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article