Kupwad ATM theft attempt | चोरट्यांचा भरबाजारात धुमाकूळ! एसबीआय आणि हिताचीचे एटीएम टार्गेट; कुपवाडमध्ये खळबळ
कुपवाडमध्ये चोरट्यांनी एटीएम मशीनवर घातला घाला
कुपवाड : कुपवाडमधील मंगळवारबाजार पेठेतील आर. पी. पाटील चौकात गुरुवारी मध्यरात्री एसबीआय व हिताची या दोन्ही बँकेचे एटीएम लुटण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
चोरट्यांनी एटीएम मशीन फोडली. पण, सुदैवाने लाखोंची रोकड बचावल्याचे स्पष्ट होताच बँक अधिकाऱ्यांनी निःश्वास टाकला. एटीएम मशिन फुटले असते तर मशिनमधील लाखो रुपये चोरट्यांच्या हाती लागले असते, असे पोलिसांनी सांगितले. याबाबत कुपवाड पोलिसांत नोंद आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्यासह पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. एटीएम मशीन फोडताना चोरटे सीसीटीव्हीतकैद झाले असून पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुपवाडमधील मुख्य रस्त्यालगत मंगळवार बाजार चौकातील दुकानगाळ्यात एसबीआय व हिताची दोन्ही बँकेचे एटीएम मशिन आहे. हे एटीएम फोडल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. पोलिसांनी संबंधित बैंक अधिकाऱ्यांना बोलावून पंचनामा केला. यात गुरुवारी मध्यरात्री एटीएम फोडल्याचे समोर आले.