३० तोळे दागिने घेवून चोरटे महामार्गाच्या दिशेने पसार
चोरटे परप्रांतीय असल्याची शक्यता
कोल्हापूर
रुईकर कॉलनी येथे बंद बंगला चोरट्यांनी अवघ्या २० मिनीटांमध्ये फोडून ३० तोळे सोन्याचे दागिने आणि २० हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली होती. या प्रकरणातील चोरटे हे परप्रांतीय असून, ते चोरीनंतर महामार्गाकडे रवाना झाल्याची माहिती सिसीटीव्ही फुटेजद्वारे समोर आली आहे. दरम्यान हे सर्व चोरटे २५ ते ३० वयोगटातील असल्याची माहितीही समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी दुपारी बिएसएनएलमधील सेवानिवृत्त कर्मचारी नामदेव दगडू खाडे (वय ५७, रा. शिंदे रेसिडेन्सी, रुईकर कॉलनी) हे नातेवाईकांना पाहण्यासाठी नजीकच्याच एका दवाखान्यात गेले होते. यावेळी अवघ्या २० ते २५ मिनीटांमध्ये चोरट्यांनी त्यांच्या घरात शिरुन ३० तोळे दागिने आणि रोख २० हजार रुपये लंपास केले होते. घर मालक आल्याची चाहूल लागताच चोरटयांनी मुख्य दरवाजाला आतून कडी घालून टेरेसवरुन पाण्याच्या पाईपवरुन उतरुन पळ काढला होता. शनिवारी (२९) रोजी दुपारी २ वाजून ४० मिनीटांच्या आसपास ही घटना घडली होती.
दरम्यान शाहूपुरी पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाकडून या गुन्ह्याचा तपास सुरु करण्यात आला आहे. पोलिसांनी परिसरातील सिसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, यामध्ये चोरटे दिसत आहेत. पोलिसांनी १५ ते २० ठिकाणचे सिसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. यामध्ये चोरटे २५ ते ३० वयोगटातील असल्याचे दिसत आहेत. एका चोरट्याने चेक्सचा शर्ट, एकाने पांढरा शर्ट तर काळा शर्ट परिधान केल्याचे दिसत आहे. याच टोळीने १५ दिवसांपूर्वी कदमवाडी आणि धैर्यप्रसाद हॉल येथे चोरी केल्याची माहिती समोर आली आहे. हे चोरटे परप्रांतीय असल्याची माहिती समोर आली असून, चोरी नंतर ते महार्गाच्या दिशेने रवाना झाले असल्याची शक्यता आहे. या दृष्टीकोनातून पोलीस तपास करत आहेत.