For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहर-तालुक्यात चोरट्यांचा धुडगूस सुरूच

12:28 PM Mar 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
शहर तालुक्यात चोरट्यांचा धुडगूस सुरूच
Advertisement

कुमारस्वामी लेआऊट-होन्निहाळमध्ये चोरीच्या घटना

Advertisement

बेळगाव : बेळगाव शहर व तालुक्यातील वेगवेगळ्या गावात बंद घरांना लक्ष्य बनविणाऱ्या टोळीचा धुडगूस वाढला आहे. कधी भरदिवसा तर कधी रात्रीच्यावेळी बंद घरांचा कडीकोयंडा तोडून सोन्या चांदीचे दागिने व रोकड पळविण्याच्या प्रकाराने बेळगावकर हैराण झाले आहेत. कुमारस्वामी लेआऊट येथील एका सरकारी अधिकाऱ्याचे घर फोडून सव्वाआठ लाखांचा ऐवज पळविण्यात आला आहे. तर होन्निहाळ, ता. बेळगाव येथील एका माजी सैनिकाचे घर फोडून दीड लाखांचा ऐवज पळविला आहे. बुधवारी या दोन्ही घटना उघडकीस आल्या असून होन्निहाळ येथील आणखी चार घरे फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. एपीएमसी व मारिहाळ पोलीस स्थानकात चोरी प्रकरणांची नोंद झाली आहे. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले होते. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून चोऱ्या, घरफोड्या वाढल्या आहेत.

कुमारस्वामी लेआऊट येथील विठ्ठल सदाशिव मोरे, मूळचे राहणार बेळकूड, ता. चिकोडी यांच्या घरात चोरी झाली आहे. मंगळवार दि. 10 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता आपल्या घराला कुलूप लावून विठ्ठल व त्यांचे कुटुंबीय बैलहोंगल तालुक्यातील यरगुद्दीला गेले होते. बुधवार दि. 11 मार्च रोजी सकाळी 8.30 वाजता चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील वॉर्डरोबमध्ये ठेवलेले 160 ग्रॅम सोन्याचे दागिने, 220 ग्रॅम चांदी असे एकूण 8 लाख 17 हजार 600 रुपये किमतीचे दागिने पळविले आहेत. घटनेची माहिती समजताच एपीएमसीचे पोलीस उपनिरीक्षक एस. आर. मुत्तती व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चोरट्यांनी चांदीची वाटी, सोन्याची कर्णफुले, चेन असे एकूण 160 ग्रॅम सोन्याचे दागिने पळविले आहेत.

Advertisement

होन्निहाळ येथील माजी सैनिकाच्या घरात चोरी 

होन्निहाळ येथील एका माजी सैनिकाच्या घरात चोरी झाली असून याबरोबरच आणखी चार घरे फोडण्यात आली आहेत. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. राचय्या वीरय्या चिकमठ यांचे घर फोडण्यात आले आहे. मंगळवार दि. 10 मार्चच्या दुपारी 2 ते बुधवारी पहाटे 5.30 यावेळेत लक्ष्मी गल्ली परिसरातील राचय्या यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून सूटकेस व ट्रंकमधील दीड लाख रुपये किमतीचे 46 ग्रॅम सोन्याचे दागिने पळविले आहेत. याच परिसरातील आणखी चार घरे फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. मारिहाळ पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Advertisement
Tags :

.