खंडाळ्यात चोरट्यांनी तीन घरे फोडली
सोन्याचे नाणे, 13 हजाराची रोकड लंपास, -जयगड पोलिसात गुन्हा दाखल
त. भा. प्रतिनिधी/ रत्नागिरी :
जिह्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरुच असून दोन दिवसांपूर्वीच शहरानजीकच्या मिरजोळे पाटीलवाडी व देवऊख येथे चोरट्यांनी घडफोडी करून डल्ला मारल्यानंतर आता तालुक्यातील खंडाळा येथे तीन घरांसह एक गोदाम फोडल्याचा प्रकार समोर आला आह़े चोरीच्या या घटनांनी जयगड पंचक्रोशी परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आह़े
वाटद खंडाळा येथील रहिवासी राकेश शशिकांत पवार (40) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रविवार 12 जुलै रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या मुख्य दरवाज्यावरील कुलूप धारदार हत्याराने तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर आतील कपाटातील सुमारे 1 ग्रॅमचे सुमारे 13 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे नाणे चोरून नेले. चोरीची माहिती मिळाल्यानंतर परिसरात चौकशी करताना आदर्शनगर येथील शुभम श्रीकांत महाडीक यांचे बंद असलेले घर, तसेच श्रीरामनगर येथील मंदार श्रीकांत बारगुडे यांच्या बिअर शॉपीचे गोडाऊन आणि परेश चंद्रकांत गुरव यांचे बंद घरही चोरट्यांनी फोडल्याचे उघड झाले. दरम्यान, एकाच परिसरात सलग तीन ठिकाणी घरफोड्या झाल्याने नागरिकांमधून प्रचंड चिंता व्यक्त होत आहे. या घटनांची नोंद जयगड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा व जयगड पोलीस करत आहेत.