पुसेगावात चोरटयांनी निवृत्त मंडलाधिकाऱ्याचे घर फोडले
पुसेगाव :
पुसेगाव (ता. खटाव) येथील भवानीनगर परिसरातील निवृत्त मंडलाधिकाऱ्याचे घर फोडून चोरट्यांनी सव्वासात लाखांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी पुसेगाव पोलीस ठाण्यात चोरट्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत राजाराम नामदेव वसव (वय 66, रा. भवानीनगर, पुसेगाव) यांनी फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 17 रोजी सायंकाळी पावणेसात ते 18 रोजी रात्री सव्वा बाराच्या दरम्यान, चोरट्यांनी वसव यांच्या राहत्या घरासमोरील गेटची व दरवाजाची कुलुपे व कोयंडा तोडून घरात घुसून कपाटातील 1 लाख 20 हजार रुपये किंमतीच्या 5 तोळे वजनाच्या 4 सोन्याच्या बांगड्या, 40 हजार रुपये किंमतीची एक सोन्याची चेन, 1 लाख रुपये किंमतीचा अडीच तोल्याचा नेकलेस, 40 हजार रुपयांचे झुबे, 20 हजारांची अंगठी, 80 हजारांचा नेकलेस, 80 हजारांचा सोन्याचा राणीहार, 40 हजार रुपयाचा नेकलेस तसेच साडेतीन तोळ्याचे सोन्याचे गंठण व 61 हजार रुपये रोख रक्कम लंपास केली.
दरम्यान, याच परिसरातील सुरज शिंदे यांच्या झोपडीतील 5 हजारांचा मोबाईल चोरीला असा एकूण 7 लाख 26 हजार रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. पुसेगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुधीर येवले तपास करत आहेत.
लवकरच आरोपी ताब्यात घेऊ
दरम्यान, पुसेगाव येथील घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी आणि सूचना केल्या. तसेच गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने श्वान पथकाच्या माध्यमातून ही तपासकार्य सुरू असून लवकरच आरोपी ताब्यात घेऊ असा विश्वास सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमाण यांनी व्यक्त केला आहे.