मुंबईचा चोर शाहूपुरी पोलिसांनी पकडला
सातारा :
शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीचा प्रकार घडला होता. त्या ठिकाणी शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने जाऊन माहिती काढली असता चोर हा मुंबईचा आहे, अशी खास खबऱ्याद्वारे माहिती मिळाली. त्यानुसार शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने नवी मुंबईत जाऊन ऋषिकेश पांडूरंग देटे (वय २९) यास अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या गुन्ह्यातील ९ लाख २० हजार रुपयांचे १३.५ तोळयाचे दागिने हस्तगत केले आहे.
याबाबत माहिती अशी, शाहुपुरी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्याचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी दिल्या होत्या. त्यानुसार शाहुपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी डीबी पथकाचे पोलीस उपनिरिक्षक ढेरे व पोलीस अंमलदार यांना मार्गदर्शन करत सूचित केले.
त्यानुसार डीबी पथकाने घटनास्थळी जाऊन घटनेची सर्व माहिती घेतली. तेव्हा त्यांना गोपनिय माहिती मिळाली की चोरटा हा मुंबईचा आहे. तो मुंबईत आहे. त्यानुसार डीबी पथक मुंबईत पोहोचले. त्या पथकाने संशयित ऋषिकेश पांडुरंग टेटे (वय २२, रा. सेक्टर १५, कोपरखैरणे, नवी मुंबई) यास मुंबईहून ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून ९ लाख २० हजार रुपयांचा १३.५ तोळे सोने हस्तगत केले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ढेरे, ढमाळ, गोवेकर व अंमलदार सुरेश घोडके, मनोज मदने, निलेश काटकर, ज्योतिराम पवार, महेश बनकर, अमर साबळे, सचिन पवार, स्वप्नील सावंत, स्वप्नील पवार, सुमित मोरे यांनी केली.