इमारतीवरुन पडून चोरट्याचा मृत्यू
सातारा :
पळून जात असताना चौथ्या मजल्याच्या टेरेसवरुन पडून त्याचा मृत्यू झाला. हि घटना पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गालगतच पिरवाडी येथे घडली.
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गालगतच पिरवाडी येथील वास्तू प्लाझा हे अपार्टमेंट आहे. त्या अपार्टमेंटमध्ये चोरटे घरफोडी करण्यासाठी 16 रोजी मध्यरात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास शिरले. त्यांनी बाहेरुन सर्व फ्लॅटना कड्या लावल्या व बंद फ्लॅटमध्ये शिरुन चोरी केली. मात्र, त्यांच्या या घरफोडीवेळी सैन्य दलातून सुट्टीवर आलेले वैभव जाधव यांना जाग आली. त्यावेळी त्यांना आपले बाहेरुन दार बंद असल्याचे समजले. त्यांच्या पत्नीने आतून बाहेरची कडी काढुन बाहेर आले. तोच बाहेर उभ्या असलेल्या चोरट्याने त्यांच्या डोक्यात लोखंडी कटावणी मारुन जखमी केले. यावेळी पळून जात असताना चौथ्या मजल्याच्या टेरेसवरुन पडून त्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या चोरट्यास स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधिन केले. अन्य चोरटे मात्र आवाजाने पळून जाण्यात यशस्वी झाले.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, पिरवाडी येथील वास्तू प्लाझा या अपार्टमेंटमध्ये 40 फ्लॅट आहेत. त्या अपार्टमेंटला चारीही बाजूने संरक्षक भिंत आहे. पार्किंगमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आहे. अपार्टमेंटला एंट्री पुणे बंगलोर महामार्गाच्या बाजूने आहे. परंतु चोरटे हे 16 रोजी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पिरवाडीच्या बाजूने मोकळे पटांगण आहे त्या पटांगणात चिखल, राडारोडा आहे त्या बाजूने उंच असलेल्या भिंतीवरुन उडी मारुन आत आले. तीन चोरटे अपार्टमेंटच्या आवारात शिरले. त्यातल्या दोघांनी लोखंडी कटावणी, पाने, स्क्रू ड्रायव्हर यासह हत्यारे घेऊन ए विंगमध्ये असलेल्या सर्वांच्या फ्लॅटला बाहेरुन कड्या लावल्या. जे बंद अवस्थेत फ्लॅट होते त्याकडे त्यांनी मोर्चा वळवला.
यामध्ये विकास जगदाळे यांचा फ्लॅट नंबर 302 चा कडी कोयंडा उचकटला. त्यांच्या फ्लॅटमध्ये 5 हजार 500 रुपये चोरले तर निलेश कृष्णा काटकर यांच्या फ्लॅट नंबर 202 चा कडीकोयंडा उचकटून 6 तोळे सोने असा सुमारे 6 लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला. मात्र, ही चोरी होत असतानाच बाजूच्या फ्लॅटमध्ये रहात असलेले वैभव गजानन जाधव यांना जाग आली. त्यांनी बाहेर कसलातरी आवाज येतो म्हणून ते दार उघडायला गेले असता त्यांना बाहेरुन कडी लावली असल्याचे समजले. त्यांची पत्नी माधवी यांनी खिडकीतून हात घालून दरवाजाची कडी काढली आणि ते दोघे बाहेर आले. तेव्हा चोरटा वेदांत शांताराम आरोडे (रा. मंचर पुणे) हा हातात लोखंडी कटावणी घेवून उभा असल्याचे दिसले. त्यास विचारणा करताच त्याने थेट त्यांच्यावर कटावणीने हल्ला चढवला. वैभव जाधव यांच्या डोळयावर थोडी झोप असल्याने त्या झोपेतही चोरट्याने केलेला हल्ला हातावर झेलला. मात्र कटावणीचा काही भाग हा डोक्यात लागल्याने ते जखमी झाले. त्यांनी लगेच काही कळायच्या आत त्या चोरट्यास पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु चोरटा एवढा चलाख होता की त्याने जिन्यातून चौथ्या मजला गाठला. त्याचा दुसरा साथीदार महेश दत्तात्रय मंगळवेढेकर हाही समोरच्या फ्लॅटच्या बाहेर उभा असल्याचे दिसताच त्याला स्थानिकांनी पकडून ठेवले. त्या दोघांचे इतर साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले.
चौथ्या मजल्यावर गेलेला चोरटा वेदांतने पळून जाण्यासाठी पाईपचा आधार घेत खाली उतरण्याचा प्रयत्न सुरु केला. परंतु तो घसरून थेट पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या स्कुटीवर पडला. त्याच्या डोक्याचा चेंदामेंदाच झाला. दरम्यान, यावेळी मोठा आवाज झाला. तोपर्यंत स्थानिकांनी 100 नंबरला फोन करुन पोलिसांना कळवले. पोलीसही लगेच घटनास्थळी पोहोचले. एकास पकडून पोलिसांच्या स्वाधिन केले. त्याच्याकडून चोरीचा ऐवजही हस्तगत केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पोलीस ठाण्यात दोन चोरट्याविरुद्ध प्रकाश बाबुराव घार्गे यांनी गुन्हा दाखल केलेला आहे.
- गोळीच घालतो असाही चोरटा म्हणाल्याने सर्वच भयभित
चोरी करताना रेड हॅण्ड सापडल्याने त्यातून सुटका करुन घेण्यासाठी जो मृत्यू पावला आहे. त्या चोरट्याने वैभव जाधव यांना गोळीच घालतो असाही दम दिला होता. त्यामुळे त्यांनी त्याला पकडून त्याची झडतीही घेतली. त्याच्याकडे पिस्टल मात्र आढळून आली नाही. वैभव जाधव यांना हिसडा देवून तो पळून जाण्याचा प्रयत्न करताना त्याचा जीव गेला.
- माधवी जाधव यांनी उघडल्या कड्या
सगळयाच फ्लॅटंना बाहेरुन कड्या लावल्या होत्या. वैभव जाधव हे मिल्ट्रीत हवालदार या पदावर कुपवाडा येथे कार्यरत आहेत. ते गेल्या पंधरा दिवसांपूर्वी सुट्टीवर आलेले आहेत. त्यांची पत्नी माधवी जाधव यांनी बाहेरची कडी हात बाहेर काढून आतून उघडली आणि ते बाहेर आले. त्यांचे पती चोरट्याबरोबर दोन हात करत असताना माधवी जाधव यांनी इतरांच्या दाराच्या बाहेरच्या कड्या पटापट उघडल्या. त्यामुळे चोरट्याला पकडण्यात यश आले.
- सातारा शहर पोलीस अवघ्या पाचव्या मिनिटाला दाखल
चोर आले, चोर आले असा आवाज अख्या अपार्टंमेंटमध्ये घुमला. सगळया लाईट्स लागल्या गेल्या. तोच मोठा आवाज झाला. कोणीतरी वरुन पडल्याचा. या सगळया गेंधळात एकाने लगेच 100 नंबर नेहमीप्रमाणे डायल केला. सुदैवाने तो फोन लागला अन् सातारा शहर पोलीस अवघ्या पाचच मिनिटात घटनास्थळी पोहोचले. सापडलेल्या एका चोरट्यास त्यांनी ताब्यात घेतले.
- स्कुटी दुरुस्तीला अन् वैभव जाधवांच्या डोक्याला पाच टाके
पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या स्कुटीवर चोरटा पडून स्कूटीचे चांगलेच नुकसान झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी स्कुटीच्या मालकाने गॅरेज दाखवले तर चोरट्याच्या हल्यात जखमी झालेल्या फौजी वैभव जाधव यांना डॉक्टरांकडे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या डोक्याला पाच टाके मारुन जखमेवर उपचार करण्यात आले आहेत. त्यांनी दाखवलेल्या धाडसाचे कौतुक होत आहे.
- उपाययोजना करण्यात येणार
दरम्यान, अपार्टमेंटमध्ये दोन्ही विंगसाठी जिना आणि लिफ्टची सोय आहे. सुरक्षा म्हणून सीसीटीव्ही आहे. सुरक्षा भिंत आहे. तरीही चोरटे आतमध्ये आल्याने आणखी सुरक्षा म्हणून दोन्ही विंगमध्ये एंट्री पॉईंटवरच सेफ्टी डोअर करण्यात येणार असल्याचे अपार्टमेंटचे चेअरमन यांनी सांगितले.
- व्हायरल झाल्यानंतर मीडियाला आली जाग
सातारा पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा वैगेरे करुन सगळे काही सोपस्कार दि. 16 ऑगस्ट रोजीच पार पडले होते. दि. 16 ऑगस्ट रोजीच दुपारी 2 वाजता गुन्हा दाखल केला होता. मात्र, या एवढ्या मोठ्या घटनेची शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी कुठे ब्र शब्द देखील काढला नाही. त्याच घटनेची जेव्हा दि. 17 रोजी दुपारी बातमी व्हायरल झाली तेव्हा मात्र मीडियाला जाग आली आणि पळापळ सुरु झाली.
..