मोटारसायकली चोरीप्रकरणी अट्टल चोरट्याला अटक
बेळगाव : मोटारसायकलींची चोरी करणाऱ्या एका अट्टल चोरट्याला हिरेबागेवाडी पोलिसांनी सोमवार दि. 1 रोजी अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे 2 लाख 55 हजार रुपये किमतीच्या पाच मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून लक्ष्मण विरुपाक्षी कणबर्गी (वय 31, रा. अडव्याप्पन अंकलगी, एम. मल्लापूर रोड, ता. गोकाक) असे त्याचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीतून मोटारसायकली चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक एस. के. होळेण्णवर, पोलीस उपनिरीक्षक अविनाश यरगोप्प, बी. के. मिटगार व त्यांचे सहकारी चोरट्यांच्या मागावर होते. सोमवारी वरील संशयिताला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता विविध ठिकाणांहून पाच मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार त्याच्याकडून 2 लाख 55 हजार रुपये किमतीच्या चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.