सोनसाखळी लांबविणाऱ्या चोरट्याला अटक
बेळगाव : घरात घुसून वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबविणाऱ्या चोरट्याला तब्बल तीन महिन्यांनंतर शहापूर पोलिसांना अटक करण्यात यश आले आहे. प्रतीक ऊर्फ श्यान्या कुमार पिळ्ळे (रा. गोल्लर गल्ली, मलप्रभानगर, वडगाव) असे त्याचे नाव असून त्याच्याकडून 90 हजार रुपये किमतीची सोनसाखळी जप्त करण्यात आली आहे. रयत गल्ली, शहापूर येथील नजीकच्या एका घरात राहणाऱ्या एकाकी वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबविण्यात आली होती. त्यामुळे याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात कुमार नामदेव कदम (रा. ढोर गल्ली, वडगाव) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास चालविला होता. मंगळवार दि. 7 रोजी वरील संशयिताला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबविल्याची कबुली दिली. त्यानुसार त्याच्याकडून सोनसाखळी जप्त करण्यात आली. पोलीस निरीक्षक सिद्धाप्पा एस. सिमानी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एन. एस. बसवा, आर. आय. सनदी, श्रीधर तळवार, जगदीश हादिमनी, शिवराज पच्चन्नावर, सिदरामेश्वर मुगळखोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.