Ratnagiri: थिबाकालीन बुद्धविहाराची जागा ‘जैसे थे’ ठेवा!, हाय कोर्टाचे आदेश
कम्युनिटी सेंटरविरोधात याचिका, 12 जूनला पुढील सुनावणी
रत्नागिरी : रत्नागिरीतील थिबाकालीन बुद्धविहाराच्या जागेत उभारण्यात येत असलेल्या कम्युनिटी सेंटरचा वाद आता उच्च न्यायालयात पोहचला आहे. यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेची गंभीर दखल घेत न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत काम ‘जैसे थे’ ठेवावे, असे आदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी आणि अद्वैत एम. सेठना यांनी दिले. आता पुढील सुनावणी 21 जून रोजी घेण्यात येणार आहे.
थिबाकालीन बुद्धविहाराच्या जागेत होणाऱ्या कम्युनिटी सेंटरविरोधात रत्नागिरीतील रत्नदीप कांबळे यांनी प्रशासनाविरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर कांबळे यांच्यावतीने अॅड. मोहित दळवी यांनी युक्तीवाद केला. न्यायालयाने याचिकेतील मुद्यांना सार्वजनिक हिताशी संबंधित मानत यास जनहित याचिका म्हणून रुपांतर करण्याचे निर्देश दिले असून त्यासाठी 2 आठवड्यांची मुदत दिली आहे.
थिबाकालीन बुद्धविहाराच्या जागेत कम्युनिटी सेंटर उभारण्यासाठी एक ट्रस्ट स्थापन करण्यात आली आहे. शासनाकडून सुमारे 7 कोटी रुपये या कम्युनिटी सेंटरच्या उभारणीसाठी मंजूर करण्यात आले असून प्रत्यक्ष काम सुरु करण्याचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान या प्रकरणी थिबाकालीन बुद्धविहाराच्या जागेत कम्युनिटी सेंटरऐवजी बुद्धविहारच उभारावे, अशी मागणी अन्य बौद्ध संघटनांकडून करण्यात आली होती. तसेच संबंधित जागा शासनाच्या ताब्यात न ठेवता ती बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावी, अशी मागणीही करण्यात आली होती.
दरम्यान या बुद्धविहाराच्या जागी कम्युनिटी सेंटर उभारणीच्या कामाला सुरुवात झाल्याने विरोधातील संघटना आक्रमक झाल्या. याप्रकरणी रत्नदीप कांबळे यांनी उच्च न्यायालयात कम्युनिटी सेंटरविरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी घेत न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत थिबाकालीन बुद्धविहाराची जागा ‘जैसे थे’ ठेवा असा आदेश दिला आहे. आता 21 जून रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.