गुन्हेगारांना सोडणार नाही पण पकडणार कधी?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिह्यातील मस्साजोगचे सरपंच देशमुख यांच्या खुन्यांना, ते कोणीही असतील तरी सोडणार नाही अशी ठिकठिकाणी घोषणा केली आहे. मात्र पंधरवडा होत आला तरी महाराष्ट्र पोलिसांना हा जो ‘कोणीही’ आहे तो सापडलेला नाही. सरकार विधिमंडळात जेव्हा बोलते तेव्हा त्यांचे बोल खरे करण्याची नोकरशाहीची तयारी हवी असते. पण, अधिकारी बीड जिह्याला अपवाद करत आहेत. विरोधकांचे काम सत्तापक्षाचे आमदार करत आहेत. न्याय कधी होणार हा प्रश्नच आहे. त्यात चिमुरड्यांवर सुरू असणारे अत्याचार डोळ्यात अश्रू उभे करत आहेत. ही स्थिती बदलली पाहिजे.
बीडचे एक निवृत्त जिल्हाधिकारी उघडपणे प्रसार माध्यमांपर्यंत येतात आणि त्या जिह्यात घडत असलेल्या प्रत्येक घटनेचे वर्णन करतात. त्यावरून या जिह्यात गेली काही वर्षे कसले जंगलराज सुरू आहे याचे दाखले मिळतात. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शिक्षकांच्या बदल्या नियमाप्रमाणे करू न देता त्यांचे संगणक काढून घेतले जातात. आयएएस अधिकारी तासन्तास कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोर गुन्हा दाखल करून घ्या म्हणून बसतात आणि त्यांचा गुन्हा दाखल करून घेतला जात नाही. शिक्षणाधिकारी भीतीने पळून जातात. ही परिस्थिती सर्वच विभागात असते. वीज कंपनीच्या आणि कोळसा प्रकल्पाच्या अभियंत्याला पाठीवर वळ येईपर्यंत मारले जाते आणि रक्षणासाठी त्याला बंदूक बाळगावी लागते.
सत्ताधारी आमदार सुरेश धस खून कसा झाला, याचे साद्यंत वर्णन करतात. सलग चार तास मारत मारत एक एक अवयव निकामी करत खून केला जातो आणि कोणीतरी व्हिडीओ कॉलवर ही मारामारी पाहत असतो हे भयानक आहे. सत्तापक्षाच्या त्याच जिह्यातील दुसरे आमदार आपल्या बूथ प्रमुखाला मारले आहे म्हणून न्याय मागतात. विरोधी आमदार जितेंद्र आव्हाड या जिह्यात 40 पेक्षा अधिक लोक बेपत्ता असून त्यांचे खून झाले आहेत, मी ठिकाणं सांगतो तिथे सरकारने उकरावे असे आव्हान देतात. या जिह्यात सेवेला आलेला एक अधिकारी बदली झालेल्या दिवसापासून बेपत्ता आहे आणि त्याचा शोध लागलेला नाही, सरकारी यंत्रणेला तो सापडला नाही असे माजी जिल्हाधिकारी सांगतात.
या जिह्यात थर्मल प्रकल्पातील कोळशाची कशी लूट सुरू आहे, गौण खनिज कसे लुटले जाते, नदी पात्राची कशी वाट लावली गेली आहे आणि कितीही उपसा झाला तरी तो रोखण्याचे धाडस कोण कसे दाखवणार? त्याऐवजी असा व्यवहार करणाऱ्यांना मिळून स्वत: मालामाल होऊ इच्छिणारा अधिकारीच तेवढा इथे टिकतो आणि अशी एक व्यवस्था या जिह्यात तयार झाली आहे असा आरोप होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात सरकार गंभीरपणे कारवाई करेल असा शब्द दिला आहे. त्याच बरोबर दलित कार्यकर्ते सुर्यवंशी यांचा कोठडीत मारहाणीत झालेला मृत्यू सुध्दा चर्चेत आहे. दोन्ही प्रकरणात पोलीस अधिकारी बेफिकिरी आणि कायदा तोडून वागले आहेत असा आरोप झालेला आहे. त्याची चौकशी होत राहील. पण, राजकारणाचे हे सत्तेच्या आश्रयाने सुरू असणारे गुन्हेगारीकरण खूपच खतरनाक आहे.
आर्थिक व्यवहारांचे आरोप
सुमारे महिनाभरापूर्वी एका तुरुंगवारी घडलेल्या अधिकाऱ्याने पत्रकार परिषद घेऊन काही राजकीय नेत्यांवर आभासी चलनाद्वारे मोठा आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप केला होता. यामध्ये त्यांनी काही आयपीएस अधिकाऱ्यांची देखील नावे घेतली होती. या प्रकरणानंतर राज्यात बऱ्याच राजकीय घडामोडी उलट्या पालट्या पद्धतीने घडल्या होत्या. हे प्रकरण लोकांच्या विस्मरणात जाईपर्यंत शुक्रवारी धस यांनी आणखी एक बॉम्ब फोडला. आपल्या मतदार संघातील एका सामान्य व्यक्तीने महादेव अॅपवरून एका दिवसात तब्बल 900 कोटी रुपयांचे व्यवहार केले असून त्याची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. या सर्व प्रकाराशी सर्वसामान्य माणसाचा काहीही संबंध नसतो. मात्र राजकारणी मंडळींचे कान मात्र टवकारले जातात. कारण, हे काय सुरू आहे याची फक्त त्यांनाच माहिती असते
गजाभाऊंची बॅटिंग
एक्स माध्यमावर गजाभाऊ नावाने एक अमेरिकास्थित सांगलीकर युवक गेली अनेक वर्षे लिहीत आहेत. त्यांनी मांडलेले मुद्देही राजकीय वर्तुळात चर्चेत असतात. हजारो लोक त्यावर व्यक्त होतात. त्यांना एकाने एक्सवरच धमकावले आणि जगात कुठेही असले तरी खेचून आणण्याचे इशारे दिले. अर्थात यापूर्वीही त्यांची अधिकाऱ्यांनी खासगीत चौकशी केली. पोलिसांनी पालकांना बोलवून माहिती घेतली. तरीही ते व्यक्त होतच आहेत.
अलीकडेच असेच एक प्रकरण आणि संवादाचे क्रीन शॉट माध्यमांवर टाकले. एका नामवंत युट्यूबरनेही ही कसली भानगड? असा प्रश्न करून सगळा संवाद वाचून दाखवला आहे आणि सरकारने याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यातील बऱ्याच घटना या निवडणुकीपूर्वी घडलेल्या असून त्या आता का जाहीर केल्या जात आहेत हे समजायला जागा नाही. एकूणच राज्याच्या राजकारणात या काही घटना खळबळ उडवत असताना नेते मात्र मौन बाळगून आहेत. आवाज उठवणाऱ्या व्यक्तींवर दबाव टाकणे, त्यांना गुंतवणे, त्यांचा खून करणे या घटना महाराष्ट्राला शोभत नाहीत.
शिवराज काटकर