...म्हणे शुभम शेळके यांना हद्दपार करा
कन्नड संघटनांची पोलीस आयुक्तांकडे हास्यास्पद मागणी
बेळगाव : बेळगावमधील मराठी भाषिकांची रोखठोक बाजू मांडणारे युवानेते शुभम शेळके यांच्याविरोधात कन्नड संघटना उभ्या ठाकल्या आहेत. शुभम शेळके यांना गुंडा कायद्यांतर्गत हद्दपार करावे, अशी मागणी पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यामुळे बेळगावमधील भाषिकवाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात शुभम शेळके यांनी आजवर कशाचीही तमा न बाळगता रोखठोक भूमिका मांडली आहे. सीमावासियांवर तोंडसुख घेणाऱ्यांना त्यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. बऱ्याचवेळा शालजोडीतील शब्दांनी अनेकांवर प्रहार केले. त्यामुळे कन्नड संघटनांची त्यांच्या विरोधात नेहमीच कोल्हेकुई सुरू असते. घटनेने दिलेल्या अधिकारानुसारच शुभम शेळके यांचे भाषण असले तरी कन्नड संघटना मात्र त्यांच्यावर आगपाखड करताना दिसतात.
शुक्रवारी काही उपद्रवी कन्नड संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी युवानेते शुभम शेळके यांना हद्दपार करा, अशी मागणी केली. शुभम शेळके आपल्या वक्तव्यातून भाषिक तेढ निर्माण करीत असल्याचे सांगण्यात आले. जनाधार नसलेल्या चमकुगिरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडून अशी हास्यास्पद मागणी करण्यात आली आहे.