आंदोलनकर्त्यांचा चौथ्या दिवशीही वनविभाग कार्यालयाबाहेर ठिय्या
कर्नाटकने १२ हत्ती सिंधुदुर्गच्या वाटेवर पाठवल्याचा आरोप
दोडामार्ग – वार्ताहर
दोडामार्ग तालुक्यावर पुन्हा एकदा हत्ती रुपी महाभयानक संकट उभे राहत असल्याचा गंभीर दावा आंदोलनकर्ते प्रवीण गवस व सहकाऱ्यांनी केला आहे. कर्नाटक–सिंधुदुर्ग सीमेवरील कणकुंबी परिसरात १२ रानटी हत्तींचा कळप स्थिरावल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. हा हत्तींचा कळप जर सड्यावरून मांगेली मार्गे दोडामार्ग तालुक्यात उतरला, तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल आणि वनविभागाला पळताभुई थोडी होईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. आज या आंदोलनाचा चौथा दिवस असून, आंदोलनकर्त्यांनी गुरुवारी वनविभागाचे कार्यालयच उघडू दिले नाही. कोणतीही ठोस लेखी हमी व प्रत्यक्ष कार्यवाही होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिका गवस यांनी जाहीर केली आहे.तालुक्यात हत्तींच्या उपद्रवामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. शेती, घरांची नुकसानभरपाई, जीवितहानीचा धोका वाढत असताना हत्ती पकड मोहीम तातडीने राबवावी, अशी मागणी वारंवार करूनही शासन व प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, स्वराज्य सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी सोमवारी तालुका वनक्षेत्रपाल कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडले होते. आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे.
१२ हत्तींचा कळपाची माहिती खरी ठरली...
ठिय्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी प्रवीण गवस यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार १२ हत्तींचा कळप सिंधुदुर्गच्या दिशेने सरकत असल्याची बाब उघडकीस आणली. कणकुंबी गावालगतच्या जंगलात हा कळप स्थिरावल्याची माहिती समोर आल्यानंतर आंदोलनकर्ते, वन कर्मचारी व पत्रकारांनी प्रत्यक्ष कणकुंबी येथे भेट दिली. स्थानिक ग्रामस्थांनीही हत्तींच्या कळपाची उपस्थिती दुजोरा दिल्यानंतर, कर्नाटक वनविभागातील अधिकाऱ्यांनीही ही माहिती खात्रीलायक असल्याचे मान्य केले. आता हा कळप जर दोडामार्गात उतरला, तर ते संकट कल्पनेपलीकडचे आणि आवरण्यास अत्यंत कठीण असेल, असा गंभीर इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.सध्या उद्भवलेली हत्ती समस्या ही लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळेच झाल्याचा ठपका आंदोलनकर्त्यांनी ठेवला आहे. सरकार कोणाचेही असो, आम्हाला आश्वासन नकोत. हत्तीमुक्त दोडामार्ग हवा असा आक्रमक इशारा देत आता शब्दांवर नव्हे तर कृतीवर विश्वास ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्य वनसंरक्षक येईपर्यंत आंदोलन सुरूच
मुख्य वनसंरक्षकांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी येऊन हत्ती पकड मोहिमेबाबत ठोस, लेखी आणि वेळबद्ध निर्णय जाहीर केल्याशिवाय हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा निर्धार उपस्थित आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. या ठिय्या आंदोलनात स्वराज्य सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, हेवाळे सरपंच साक्षी देसाई, कळणे सरपंच अजित देसाई, शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष संजय देसाई यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.