दफनभूमीत राहतात... थडग्यांनजीक बेड
फिलिपाईन्सची राजधानी मनीलामध्ये एक अशी दफनभूमी आहे, जेथे हजारो लोक स्वत:च्या परिवारासोबत राहतात. हे ठिकाण मनीला नॉर्थ सेमेट्री नावाने ओळखले जाते. येथे सुमारे 6 हजारांहून अधिक लोक राहतात, त्यांनी थडग्यांदरम्यानच स्वत:चे घर थाटले आहे. हे लोक थडग्यांवर किंवा त्याच्या आसपास छोटे घर उभारून राहतात. एवढेच नाही तर हे लोक तेथेच स्वयंपाक करतात, जेवतात आणि स्वत:चे दैनंदिन जीवन जगतात.
या अनोख्या वस्तीची सर्वात खास बाब म्हणजे येथे राहणारे अनेक लोक स्वत:च्या प्रियजनांच्या थडग्यांनजीकच घर निर्माण करतात. यामुळे आपण परिवाराच्या दिवंगत सदस्यांच्या जवळ राहतो असे त्यांचे मानणे आहे. परंतु यामागे एक मोठे कारण आर्थिक हतबलता देखील आहे. फिलिपाईन्समध्ये वाढती लोकसंख्या आणि गरीबीमुळे अनेक लोकांकडे राहण्यासाठी पुरेशी जागा नाही. अशास्थितीत ते स्वस्त किंवा मोफत राहण्याचे ठिकाण शोधतात आणि दफनभूमी त्यांना एक पर्याय वाटतो. हळूहळू हे ठिकाण एका पूर्ण वसाहतीत बदलले असून तेथे मुले खेळतात, लोक कामावर जातात आणि सामान्य जीवन जगण्याचा प्रयत्न करतात.
आव्हानांचा सामना
येथे राहणे सोपे नाही, साफसफाईचा अभाव, मर्यादित साधनसामग्री आणि सुरक्षेची समस्या येथील रहिवाशांसाठी मोठे आव्हान आहे. तरीही या लोकांनी स्वत:च्या परिस्थितींशी तडजोड करत या ठिकाणाला स्वत:चे घर केले आहे.