For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

परतीचा मार्ग विसरले, जंगलात फसले

01:03 PM Apr 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
परतीचा मार्ग विसरले  जंगलात फसले
Advertisement

विर्डी जंगलात पाच पर्यटक विद्यार्थ्यांवर ओढवला बाका प्रसंग

Advertisement

दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिह्यातील दोडामार्ग तालुक्यातील विर्डी परिसरातील निसर्गरम्य पण तितकाच धोकादायक वज्रासखल धबधबा... हिरवाईने नटलेले हे ठिकाण दिवसाढवळ्dया जितके मोहक वाटते, तितकेच सायंकाळनंतर भयाण रुप धारण करते. याच ठिकाणी सहलीसाठी गेलेल्या अठरा वर्षीय पर्यटक विद्यार्थ्यांवर एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना ओढवली आणि काही तासांसाठी त्यांचा प्रत्येक क्षण मृत्यूच्या सावटाखाली गेला. गोव्यातील फोंडा येथील चार मुलगे व एक मुलगी अशी विर्डी गावातून वज्रासखल धबधबा याठिकाणी गेले होते. सायंकाळनंतर धबधब्याच्या परिसरात रममाण झालेले हे विद्यार्थी नंतर परतीचा मार्ग शोधू लागले. मात्र, नकळत ते जंगलाच्या आत खोलवर गेले. अंधार वाढत गेला तसे रस्त्याचे सर्वच संकेत नाहीसे झाले. मोबाईलचा नेटवर्क कमकुवत, सभोवताली घनदाट झाडे आणि कुठेतरी दूरवरून येणारे वन्यप्राण्यांचे आवाज...भीतीने त्यांची अवस्था क्षणोक्षणी गंभीर होत होती.

112 वर कॉल

Advertisement

या जीवघेण्या परिस्थितीत त्यांनी शेवटचा पर्याय म्हणून पोलिसांच्या आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक 112 वर सायंकाळी 7.15 वाजता संपर्क साधला. नागपूर येथील नियंत्रण कक्षात हा कॉल प्राप्त होताच त्याची गंभीर दखल घेण्यात आली आणि काही क्षणातच ही माहिती सिंधुदुर्ग पोलिसांकडे पोहोचवण्यात आली. तेथून दोडामार्ग पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली. दोडामार्ग पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे, व सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक मानसी महेश गावडे आणि पोलीस हवालदार बाळकृष्ण गवस यांनी कोणताही विलंब न करता घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र, त्यांच्या समोरचे आव्हान अत्यंत कठीण होते. विर्डीपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता असला तरी पुढे जाण्यासाठी कोणताही वाहन मार्ग नव्हता. पुढील प्रवास पूर्णत: पायी करावा लागणार होता. तोही एक ते सव्वा तासाचा, खडतर, जंगलातून जाणारा आणि पूर्ण अंधारात बुडालेला. विर्डी गावात पोहोचल्यानंतर पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थ आणि तळेखोल पोलीस पाटील यांच्या मुलाची मदत घेतली. त्या परिसराची चांगली माहिती असलेल्या ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे शोधमोहीमेला दिशा मिळाली. हातात टॉर्च, आजूबाजूला अंधार आणि मनात एकच ध्यास हरवलेल्या मुलांना शोधून सुरक्षित परत आणायचे या निर्धाराने पोलीस आणि ग्रामस्थ जंगलात उतरले.

जंगलात अंधार, मनात भीतीचा कहर

दरम्यान, हरवलेले विद्यार्थी एका नदीकाठी थांबून होते. चार तासांहून अधिक काळ ते उपाशीपोटी, भीतीने थरथरत बसले होते. त्या परिसरात अस्वले, वाघ, कोल्हे आणि इतर वन्यप्राण्यांचा वावर असल्यामुळे त्यांची भीती अधिकच वाढली होती. अंधाराने परिस्थिती आणखीच भयावह केली होती. प्रत्येक आवाज त्यांना धोका वाटत होता आणि प्रत्येक क्षण अनिश्चिततेने भरलेला होता.

10.45 वा. पर्यटक विद्यार्थ्यांचा लागला शोध

जंगलात शोधमोहीम सुरू असताना पोलीस आणि ग्रामस्थ सतत हाका मारत पुढे सरकत होते. अखेर रात्री सुमारे 10.45 वाजता वज्रासखल धबधब्याजवळ हरवलेल्या विद्यार्थ्यांचा शोध लागला. त्या क्षणी जणू काळ थांबला होता. पोलिसांचा आवाज ऐकताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला दिलासा, त्यांच्या डोळ्dयात आलेले अश्रू आणि सुटकेचा नि:श्वास हा सगळा अनुभव अत्यंत भावनिक होता. त्यांच्यासोबत एक मुलगी आणि चार मुलगे होते. त्यांनी सांगितले की, ते सर्वजण धबधबा पाहण्यासाठी गेले होते, मात्र अंधार पडल्यामुळे रस्ता चुकले आणि जंगलात अडकले. पोलिसांना पाहताच त्यांच्या मनातील भीतीचा भार हलका झाला. नंतर पोलीस आणि ग्रामस्थांनी त्यांना अत्यंत काळजीपूर्वक जंगलातून बाहेर काढले आणि त्यांच्या मोटारसायकलपर्यंत सुरक्षित पोहोचवले. तो प्रवास केवळ परतीचा नव्हता, तर नवजीवनाचा अनुभव देणारा होता. या संपूर्ण घटनेत पोलिसांची तत्परता, धाडस आणि कर्तव्यनिष्ठा स्पष्टपणे दिसून आली. वेळेवर मिळालेला कॉल, तातडीने उचललेले पाऊल, प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगता केलेली शोधमोहीम आणि ग्रामस्थांसोबत साधलेला उत्तम समन्वययामुळेच या तऊणांचे प्राण वाचू शकले.

पोलिसांच्या कार्याला सलाम

विर्डीचे जंगल हे निसर्गाने समृद्ध असले, तरी तेवढेच धोकादायकही आहे. तेथे  वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर असल्याने पर्यटकांनी विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे. ही घटना प्रत्येकासाठी एक धडा आहे. निसर्गाचा आनंद घेताना सावधगिरी बाळगणे तितकेच महत्त्वाचे आहे. अंधाराच्या गर्तेत अडकलेल्या त्या तऊणांसाठी पोलीस म्हणजेच आशेचा किरण ठरले. एका फोन कॉलने सुरू झालेली ही धावपळ शेवटी जीव वाचवणाऱ्या यशस्वी मोहिमेत बदलली. पोलिसांच्या या धाडसी कार्याला आणि त्यांच्या आपत्कालीन हेल्पलाईन 112 सेवेला मनापासून सलाम.

Advertisement
Tags :

.