ते आले समोरासमोर, हस्तांदोलनही केले,पण चेहऱ्यांवर हास्य अजिबात नाही उमटले...
पणजी : मंत्रिपदावरून हकालपट्टी केल्यानंतर प्रथमच गोविंद गावडे आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची कला अकादमीमध्ये मंगळवारी भेट झाली. मात्र गोविंद गावडे यांचा चेहरा फारच गंभीर होता आणि मुख्यमंत्री देखील त्यांना हस्तांदोलन करताना त्यांच्या चेहऱ्यावर मुळीच हास्य नव्हते. कला अकादमीमध्ये प्रख्यात गायक पं. अजित कडकडे यांना सर्वोच्च गोमंत विभूषण पुरस्कार प्रदान करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मुख्यमंत्री आणि अजित कडकडे यांच्या स्वागतासाठी कला अकादमीच्या बाहेर खासदार सदानंद तानावडे, मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो, आमदार केदार नाईक आणि आमदार संकल्प आमोणकर उपस्थित होते.
आमदार गोविंद गावडे हे कला अकादमीच्या सभागृहात पहिल्या रांगेत बसून होते. कला अकादमीच्या बाहेर सुरू झालेली मिरवणूक थेट व्यासपीठापर्यंत आली. त्या मिरवणुकीत मुख्यमंत्री स्वत: सहभागी झाले होते. दिंडी, भजन करीत पथक व्यासपीठापर्यंत पोहोचले. त्यावेळी मुख्यमंत्री आणि गोविंद गावडे यांची समोरासमोर भेट झाली. मुख्यमंत्र्यांनी लागलीच हस्तांदोलन केले, मात्र मुख्यमंत्री सावंत आणि गोविंद गावडे यांच्या चेहऱ्यांवर कोणतेही हास्य नव्हते. गोविंद गावडे यांच्यासह चारही आमदारांना मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावर घेतले. मात्र व्यासपीठावर बसून देखील गोविंद गावडे यांचा चेहरा फार गंभीर दिसत होता.
अधूनमधून ते आपला भ्रमणध्वनी तपासत होते. मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केल्यानंतर मुख्यमंत्रीदेखील मंत्री गावडे यांच्याबाबत फार गंभीर राहिले होते. रविवारी झालेल्या सभेत पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्यात आले होते. त्यामुळे दुखावलेल्या मुख्यमंत्र्यांनी देखील गोविंद गावडे यांना किंचित बाजूला ठेवल्याचे दिसून आले. गावडे यांच्या जागी आता समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई हे बसले होते आणि त्यांनी थेट मराठीतून झक्कास भाषण केले आणि मुख्यमंत्री त्यांच्यावर बेहद्द खुश झाले.