For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जे सर्वभावाने भगवंतांना भजतात, तेच मायानदी सहज तरून जातात

06:29 AM Jul 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
जे सर्वभावाने भगवंतांना भजतात  तेच मायानदी सहज तरून जातात
Advertisement

माझी ही त्रिगुणी दैवी माया न तरवे कुणा । कासेस लागले माझ्या ते चि जाती तरूनिया ।। 14 ।।

Advertisement

ह्या श्लोकाच्या विवरणात माउली मायानदीची भीषणता आपल्याला सांगत आहेत. ज्यांना स्वत:च्या सामर्थ्याचा फाजील आत्मविश्वास असतो ते कुणाचीही मदत न घेता ही मायानदी ओलांडून जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामागे समोर दिसणाऱ्या जगाचे खोटेपण लक्षात आल्याने नित्य अशा ईश्वराला भेटण्याची ओढ असते. मायानदीच्या पलीकडल्या निवृत्ती नावाच्या काठावर ईश्वर उभा असतो. त्यांचा हेतू कितीही चांगला असला तरी ही मायानदी पौरुष प्रयत्नावर म्हणजे स्वबळावर ओलांडणे अशक्य असते. कितीतरी जणांनी वेदरूपी होडीचा मायानदीतून तरण्याकरता आश्रय घेतला. खळाळणाऱ्या पात्रात ती होडी न डगमगता स्थिर रहावी म्हणून त्यांनी त्यात अभिमानाचे मोठे धोंडे घातले. अशा होड्यांना मदरूपी माशांनी गिळून टाकले. कित्येकांनी आपण वृद्धपणी मायानदी तरुन जाण्याचा प्रयत्न करू असे ठरवून तारुण्यात असताना मदनाची कास धरली. त्यामुळे त्यांना मायानदीच्या काठावर पहुडलेल्या विषयरूपी मगरांनी चघळून टाकले. जे म्हातारपणी मायानदी ओलांडण्याचा प्रयत्न करतात ते गैरसमजाच्या लाटेवर वहात जाऊन बुद्धिभ्रंशरूपी जाळ्याने चोहोबाजूंनी व्यापले जातात. त्यातून सुटण्याची व्यर्थ धडपड करत असताना ते शोकरूपी काठावर आपटून क्रोधरूपी भोवऱ्यात गुरफटून जेथे वर येतील तेथे संकटरूपी गिधाडाकडून टोचले जातात. त्यामुळे ते दु:खरूपी चिखलात रुततात आणि मरणाच्या गाळात फसतात. ज्यांनी यज्ञरूपी पेटी मायानदी तरण्याकरता आपल्या पोटाशी बांधली, ते स्वर्गसुखाच्या कपारीमध्ये अडकून राहिले. कित्येकांनी मोक्षरूपी पलीकडच्या किनाऱ्याला लागू या आशेने कर्मरूपी बाहूंवर विश्वास ठेवला, परंतु ते विधिनिषेधांच्या वळणात सापडले.

माऊली पुढे म्हणतात, मायानदीत वैराग्याची होडी प्रवेश करू शकत नाही, त्याचप्रमाणे विवेकरूपी वेळूला तिचा ठाव लागत नाही. त्यातल्यात्यात अष्टांग योगाचा काहीवेळा उपयोग होतो पण त्यातही यश क्वचितच मिळते. इथून पुढे माया नदी स्वसामर्थ्यावर तरुन जाणे किती अशक्य आहे हे पटवून देण्यासाठी माऊली काही अशक्य गोष्टींची उदाहरणे देतात आणि म्हणतात, जर ह्या गोष्टी घडल्या तरच मायानदी स्वबळावर तरुन जाणे शक्य होईल. त्या गोष्टी म्हणजे, जेव्हा पथ्य न पाळता आजार बरा होईल, लोभी माणसाला ऐश्वर्य प्राप्त झाले असता तो त्याचा त्याग करेल, चोरांची चौकशी करणारा न्यायाधीशच चोरांना घाबरेल, माशाला गळ गिळता येईल, एखाद्या भित्र्या मनुष्याला पिशाच्चावर हल्ला करता येईल, तरच मायानदीच्या पलीकडच्या काठाला जीव पोहोचू शकेल.

Advertisement

ज्याप्रमाणे विषयी पुरुषाला स्त्राr जिंकता येत नाही, त्याप्रमाणे जीवांना ही मायारूप नदी स्वसामर्थ्याने तरता येत नाही. अशा स्थितीत जे सर्वभावाने भगवंताना भजतात, तेच ही मायानदी सहज तरून जातात, कसे तर त्यांनी केलेल्या भक्तीमुळे मायानदीचा प्रभाव नष्ट होऊन ते अलीकडील काठावर असतानाच मायानदीचे पाणी आटून जाते.

क्रमश:

Advertisement
Tags :

.