Thet Paipline Kolhpaur : सोळांकुरजवळ थेट पाईपलाईनला गळती, लाखो लीटर पाणी वाया
अधिकाऱ्यांच्या कारभाराबाबत स्थानिक भूमिपुत्रांतून संताप व्यक्त होत आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर थेट पाईपलाईन योजनेचा सोळांकूर (ता. राधानगरी) येथील डाव्या कालव्याजवळ व्हॉल्व लिकेज झाल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. मंगळवारी रात्री सुरू झालेली ही गळती बुधवार दुपारपर्यंत होती. योजनेच्या सुरुवाती पासूनच पाईपलाईनला ठिकठिकाणी गळती सुरु आहे. त्यातून आतापर्यंत कोट्यवधी लीटर पाणी वाया गेले. यामुळे कामाबाबात प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
पावसाळ्यापूर्वी सर्वच पाईपलाईन मार्गाची पाहणी करावी, अशी मागणी स्थानिक लोकांतून होत आहे. या योजनेमुळे स्थानिक भूमिपुत्रांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. अधिकाऱ्यांच्या कारभाराबाबत स्थानिक भूमिपुत्रांतून संताप व्यक्त होत आहे. गळतीमुळे शहरवासीयांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. तर दुसरीकडे धरणातील शुद्ध पाणी वाया जात आहे.
त्यामुळे सर्वच पाईपलाईन मार्गाची पाहणी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. कोल्हापूर थेटपाईप लाईन योजनेच्या अनेकदा होणाऱ्या गळतीमुळे धरणातील पाणी वाया जाण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून जाण्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. धरणातील पाणी वाया जात असल्याने अधिकारी वर्गाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन गळती होऊ नये यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे