सेन्सेक्स, निफ्टीत या कंपन्यांचा होणार प्रवेश
मुंबई :
बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी यांच्या कंपन्यांच्या यादीमध्ये येत्या काळात बदल होणार आहे. कमकुवत प्रदर्शन करणाऱ्या काही कंपन्या निर्देशांकांमधून बाहेर पडणार आहेत. तर काही कंपन्या यादीत प्रवेश करणार आहेत. निर्देशांकाचा समतोल राखण्यासाठी असे केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
जूनमध्ये नव्या कंपन्यांचा समावेश 30 समभागांच्या सेन्सेक्स निर्देशांकामध्ये होऊ शकतो. यामध्ये धातू क्षेत्रातील कंपनी हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेडचे नाव घेतले जात आहे. हिंडाल्कोचा सेन्सेक्समध्ये समावेश झाल्यानंतर दुसरीकडे टाटा समूहातील ट्रेंट लिमिटेड हा समभाग यादीतून बाहेर पडणार आहे. ट्रेंटचे प्रदर्शन गेल्या काही महिन्यांपासून कमकुवत होत असून समभागाचा भाव सर्वोच्च स्तरावरुन निम्म्यावरती आला आहे.
हिंडाल्कोचा समभाग सातत्याने वाढत असून सोबत बाजार भांडवल मूल्यातही चांगली वृद्धी होत आहे. हे पाहता सेन्सेक्समध्ये हा समभाग सामावला जाऊ शकतो. निफ्टी 50 निर्देशांकामध्ये मात्र कोणताही बदल होणार नसल्याचे सांगितले जात आहे.
हेही समभाग होणार समाविष्ट
निफ्टी 100 आणि निफ्टी नेक्स्ट 50 निर्देशांकात येत्या काळात टाटा मोटर्स, मुथूट फायनान्स, एचडीएफसी एएमसी, कमिन्स इंडिया आणि युनियन बँक ऑफ इंडिया हे समाविष्ट होऊ शकतात. बजाज हाऊसिंग फायनान्स, जेएसडब्ल्यू एनर्जी, इन्फोएज इंडिया, हॅवल्स इंडिया आणि आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स यांची ते जागा घेऊ शकतात.