ब्रेकअप झालाय, ब्रेक हवाय
गुरुग्रामचे एक उद्योजक जसवीर सिंह यांनी (नॉट डेटिंग कंपनीचे सहसंस्थापक आणि सीईओ) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी एका कर्मचाऱ्याचे ‘सर्वात प्रामाणिक लीव्ह अॅप्लिकेशन’ दाखविले आहे. जेनझेड आता काहीच लपवत नाही, असे जसवीर यांनी म्हटले आहे. म्हणजेच आताची पिढी स्वत:चे म्हणणे आणि मानसिक आरोग्याविषयी उघडपणे बोलते.
एका कर्मचाऱ्याने ईमेल केला होता, ज्यात काही कारणामुळे सुटी मागण्यात आली होती. ब्रेकअपनंतर कामावर लक्ष केंद्रीत करण्यास अडचण येते आणि यातून बरे होण्यास काही दिवसांच्या सुटीची गरज असल्याचे कर्मचाऱ्याने म्हटले होते. या पोस्टमध्ये सिंह यांनी सुटीच्या अर्जाचा एक स्क्रीनशॉट जोडला असून यात ‘अलिकडेच माझा ब्रेकअप झाला असून मी कामावर लक्ष केंद्रीत करू शकत नाही, मला काही काळासाठी सुटी हवीय. मी आज घरातून काम करतेय, याचमुळे मी 28-8 तारखेपर्यंत सुटी घेऊ इच्छिते’ असे नमूद आहे.
लोकांकडून बॉसचे कौतुक
पोस्टनंतर अनेक लोकांनी संबंधित कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. तर आता ऑफिस कल्चर बदलत आहे. लोक मानसिक अणि भावनांबद्दल उघडपणे बोलत आहेत, असे दिसून येत असल्याचे काही लोकांनी म्हटले आहे. काही युजर्सनी सुटी मंजूर केली का, अशी विचारणा सिंह यांना केली. यावर त्वरित मंजूर केली, असे उत्तर त्यांनी दिले.