खते,बियाणांची टंचाई भासू देणार नाही
सांगली :
जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र ८ लाख ६१ हजार हेक्टर असून निव्वळ पिकाखालील क्षेत्र ५ लाख ७६ हजार ९०३ हेक्टर आहे. जिल्ह्यातील खातेदार संख्या ६ लाख ८६ हजार १२२ आहे.
या वर्षी पाऊसमान चांगले असून जूनच्या मध्यानंतर पेरणीरा वेग आला आहे. खते व बियाणांची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही पालकमंत्री चंद्राकांत पाटील यांनी दिली आहे. शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या निविष्ठा पुरविण्यास शासन कटिबद्ध आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांचा जन्म दिवस राज्यात कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
पाटील यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे, कै. वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना राज्याला दुष्काळास सामोरे जावे लागले. शेतकरी जगला तर देश जगेल असे त्यांचे मत होते. त्यानुसार कै. वसंतराव नाईक यांनी राज्याच्या कृषी विकासाची पायाभरणी करून विविध योजनांची सुरवात केली होती. राज्याला अन्नधान्याच्या बाबतीत त्यांनी स्वयंपूर्ण केले होते.
आज देशात महाराष्ट्र कडधान्य, फळे, भाजीपाला उत्पादनात व कृषी प्रक्रियेमध्ये आघाडीवर आहे. सांगली जिल्हा देखील कृषी क्षेत्रात चांगली प्रगती करत आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील सुमारे ४ लाख शेतकरी बांधवाना १४४४.८५ कोटी १९ हप्त्यांमध्ये फेब्रुवारी अखेर वितरीत केले आहेत. नमो शेतकरी महासन्मान योजने अंतर्गत ४७७.२४ कोटी ६ हप्त्यांमध्ये एप्रिल अखेर वितरित केले आहेत.
कृषी क्षेत्रात डिजीटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारक लाभ देण्याच्या उद्दिष्टाने राज्यात अॅग्ग्रिस्टॅक योजना राबविण्यात येत आहे. आतापर्यंत या योजनेतून ३ लाख ७९ हजार शेतकऱ्यांनी शेतकरी ओळख क्रमांक घेतला आहे. अवकाळी पाऊस, गारपीट, अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते.
सन २०२४-२५ मध्ये एकूण १२ हजार ९४२ हेक्टर क्षेत्राकरिता २९ कोटी ९३ लाख रुपये अनुदान ३३ हजार ६७८ शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले आहे. आत्मनिर्भर योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये वैयक्तिक घटकामध्ये सन २०२०-२०२१ पासून आजअखेर १३३३ प्रकल्प मंजूर आहेत.
लाभार्थ्यांना ३८.७१ कोटी अनुदान मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने बेदाणा प्रक्रिया, तृणधान्य प्रक्रिया, कडधान्य प्रक्रिया, मसाला उद्योग, दुग्ध प्रक्रिया उद्योग, फळ व भाजीपाला प्रक्रिया, बेकरी पदार्थ, गूळ प्रक्रिया, खाद्यतेल प्रक्रिया, पशुखाद्य निर्मिती इत्यादी उद्योगांचा समावेश आहे. या योजनेद्वारे सुमारे ५९५५ कुशल व अर्धकुशल कामगारांना रोजगार निर्माण झाला आहे.
- जिल्हयातून चौसष्ठ हजार टन निर्यात
जिल्ह्यामध्ये उत्पादनक्षम फळबाग लागवडीचे एकूण क्षेत्र सुमारे ५०,००० हेक्टर आहे. प्रामुख्याने द्राक्ष व डाळिंब या पिकांचा समावेश आहे. विविध योजनेच्यो माध्यमातून जिल्ह्याचे फळ पिकाखालील क्षेत्र वाढवून निर्यातीस चालना देण्याचा मानस आहे. गतवर्षी जिल्ह्यातून एकूण ६४,१५६ मे. टन कृषी मालाची निर्यात झाली आहे. या निर्यातीमध्ये द्राक्ष, मका, रवा, हळद, भाजीपाला, डाळिंब दाणे (अनारदाणा) इत्यादी शेतमालाचा समावेश आहे.