नोव्हेंबरमध्ये कोणतीही राजकीय क्रांती नाही : सिद्धरामय्या
बेंगळूर : मागील आठवड्यात मंत्री जमीर अहमद खान यांनी नोव्हेंबरमध्ये मंत्रिमंडळाची पुनर्रचना होणार असून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याच्या आधारावर विरोधी पक्षातील नेत्यांनी नोव्हेंबर महिन्यात मुख्यमंत्री बदलणार असल्याचे म्हटले आहे. त्यावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्टीकरण दिले असून नोव्हेंबरमध्ये कोणतेही बदल होणार नाहीत, असे सांगितले आहे. याद्वारे त्यांनी पूर्ण कालावधीसाठी (पाच वर्षे) मीच मुख्यमंत्री असल्याचे अप्रत्यक्षपणे म्हटले आहे. कोप्पळ येथे सोमवारी पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना नोव्हेंबरमध्ये राज्यात राजकीय क्रांती होईल का, असा प्रश्न केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी नोव्हेंबरमध्ये कोणतीही क्रांती होणार नाही. सर्वेक्षणामागे कोणावर अन्याय करण्याचा सरकारचा उद्देश नाही. समान समाज निर्माण करण्याचे आमचे ध्येय आहे. ज्यांना बदल नको आहे, ते सर्वेक्षणाला विरोध करत आहेत, अशी टिप्पणीही सिद्धरामय्या यांनी केली. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सर्वेक्षणात सहभागी होणार नसल्याचे विधान केले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना सिद्धरामय्या म्हणाले, केंद्र सरकार जातनिहाय जनगणना करेल, तेव्हा प्रल्हाद जोशी विरोध करतील का?, प्रसारमाध्यमांनी जोशी यांना हा प्रश्न विचारला आहे का?, असा प्रतिप्रश्न सिद्धरामय्या यांनी केला.