बदल होतील, आराखडा रद्द होणार नाही!
रत्नागिरी :
लांजा शहर विकास आराखड्यावरून सुरू असलेल्या राजकीय धुळवडीत लांजा-राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी आपली भूमिका स्पष्ट करत विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आराखड्यात आवश्यक बदल करण्यात येतील, ही आपली पहिल्यापासूनची भूमिका आहे. भविष्यात लांजा शहराच्या विकासासाठी हा आराखडा महत्त्वाचा आहे. मात्र काही लोकांना यात राजकारण करायचे आहे, अशा शब्दांत सामंत यांनी विरोधकांवर तोफ डागली.
येथील शासकीय विश्रामगृहावर बुधवारी आमदार सामंत पत्रकारांशी बेलत होते. गेल्या काही दिवसांपासून लांजा शहर विकास आराखड्याला काही घटकांकडून विरोध होत असताना, काही जणांचा याला पाठिंबाही आहे. आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर झालेल्या समन्वय बैठकीत मुख्याधिकारी आणि नगररचना विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी काहींनी समन्वयाची तर काहींनी विरोधाची भूमिका घेतली होती. मात्र, हा आराखडा रद्द होणार नाही. नागरिकांनी आवश्यक ते बदल सुचवावेत. त्याप्रमाणे त्यात बदल करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
- मंत्री नीतेश राणेशी बोलणार
विकास आराखड्याबाबत काही जण राजकारण करत असून त्यांनी आंदोलनही केले आणि मंत्री नीतेश राणे यांचीही भेट घेतली. आपण स्वत: नीतेश राणे यांच्याशी बोलणार असून त्यांचीही भूमिका आराखडा नको अशी नसेल, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला. या आराखड्यामुळे कोणाचेही नुकसान होणार नाही आणि कोणाचीही जागा फुकट घेतली जाणार नाही. योग्य मोबदला दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
- लांजा-राजापूरसाठी ‘काहीतरी स्पेशल’
पाणी, शाळा, आरोग्य, वीज आणि औद्योगिकरण हे आपल्या मतदारसंघातील विकासाचे प्रमुख लक्ष्य आहे. त्यादृष्टीने वाटचाल सुरू असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी लांजा-राजापूरसाठी ‘काहीतरी स्पेशल’ देण्याचे कबूल केले आहे. याबाबत लवकरच निर्णय होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
- आगामी निवडणुका महायुतीनेच
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती म्हणूनच सामोरे जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व शिवसेनेच्यावतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच बैठका घेऊन निर्णय घेतील, असे आमदार किरण सामंत म्हणाले.
- लांजाच्या भविष्यातील विकासासाठी आराखडा दिशादर्शक
लांजाच्या भविष्यातील विकासासाठी हा आराखडा दिशादर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त करत आमदार सामंत यांनी लांजा-राजापूरमध्ये औद्योगिकरण होणे आवश्यक असल्याचे अधोरेखित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नारायण राणे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून या भागात इलेक्ट्रिक व्हेइकल कारखाना आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या लोकांशी चर्चा करून जवळपास साडेसहा हजार हेक्टर जागेवर हे प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सामंत यांनी सांगितले. युवा पिढीला स्थानिक पातळीवर रोजगार मिळावा यासाठी वाटद भागात प्रदूषणविरहित डिफेन्स, ड्रोन आणि सोलर बॅटरीचे प्रकल्प येणार असून स्थानिकांनाच उद्योगात प्राधान्य दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे येथील बंदराचा विकासही केला जात असल्याचे सामंत यांनी सांगितले.