नवीन वर्षात विमा क्षेत्रात होणार मोठे बदल
आयआरडीएची भविष्यात आकर्षक नव्या योजना : विमाधारकांना केंद्रीत ठेवत अनेक सुविधा होणार प्राप्त
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीए) नवीन वर्षात अनेक विमा योजनांचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. विमा विस्तार योजना प्रत्येक गावात नेण्यासाठी विमा वाहक नियुक्त केले जाणार असून ज्यामध्ये प्रामुख्याने महिलांची विमा वाहक म्हणून नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी आयआरडीएने दिली आहे.
विमाधारकांना अनेक फायदे
आयआरडीएद्वारे विमा विस्तार योजना नवीन वर्षात कधीही सुरू केली जाऊ शकते. मात्र, जानेवारी महिन्यापासून ती सुरू होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. विमा विस्तार योजनेत एकाचवेळी अनेक लाभ देण्याची योजना आखण्यात येणार आहे. यामध्ये आरोग्य, आयुर्विमा, मालमत्ता विमा, अपघात अशा सुविधा एकत्रितपणे उपलब्ध होणार आहेत.
प्रत्येक नागरिकाला मिळणार विमा संरक्षण
आयआरडीएने सन 2047 पर्यंत देशातील सर्व नागरिकांना विम्याच्या कक्षेत आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या योजनेअंतर्गत विमा संरक्षणाची रक्कम 1 लाख ते 2 लाख रुपयांपर्यंत असू शकते. विमा विस्तार योजना सुरू झाल्यानंतर विमा वाहक योजनाही सुरू होणार आहे. विमा वाहकांच्या माध्यमातून अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत. विमा कंपन्या विमा वाहकांना इलेक्ट्रॉनिक फॉर्म आणि इलेक्ट्रॉनिक मशीन प्रदान करतील. इलेक्ट्रॉनिक मशीनद्वारे ग्राहकांचे केवायसी केव्हाही करणे सोपे होईल. याशिवाय ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक स्वरूपातही व्यवहार करता येणार आहेत.