मालदीव अध्यक्षांविरोधात महाभियोग प्रस्ताव येणार
वृत्तसंस्था / माले
चीनच्या आहारी जाऊन भारताला विरोध करणारे मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुईझ्झू हे स्वत:च अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांच्या विरोधात महाभियोग चालविण्याचा प्रस्ताव देण्याची तयारी तेथील विरोधी पक्ष करीत आहेत. मुईझ्झू यांचा प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या एमडीपी या पक्षाकडे त्या देशाच्या संसदेत बहुमत आहे. हाच पक्ष महाभियोग प्रस्ताव आणणार आहे.
मालदीवियन डेमॉव्रेटिक पार्टी (एमडीपी) या विरोधी पक्षाने महाभियोग प्रस्ताव मांडण्यासाठी पुरेशा स्वाक्षऱ्या मिळविलेल्या आहेत, असे प्रतिपादन तेथील एका स्थानिक वृत्तपत्राने केले आहे. या पक्षाला अन्य विरोधी पक्षांनीही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महाभियोग प्रस्ताव स्वीकारला जाण्याची शक्यता आहे.
संसदेत मारामारी
मुईझ्झू यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाची स्थापना केली असून, तेथील नियमाप्रमाणे या मंत्रिमंडळाला संसदेची संमती असणे आवश्यक आहे. मात्र, विरोधी पक्षाचे बहुमत असणाऱ्या संसदेने चार मंत्र्यांच्या नावांना संमती नाकारली होती. त्यामुळे त्यांचा समावेश मंत्रिमंडळात करणे अशक्य झाले आहे. याच मुद्द्यावरुन दोन दिवसांपूर्वी या देशाच्या संसदेत मुईझ्झू यांचे समर्थक आणि विरोधक यांच्यात हाणामारी झाली होती, या मारामारीची व्हिडीओ दृष्ये सोशल मिडियावर पहायला मिळत आहेत.
परस्परविरोधी प्रस्ताव
मालदीवच्या संसदेत एमडीपी या पक्षाचे बहुमत असून तो मुईझ्झू यांचा विरोधक पक्ष आहे. या पक्षाच्या संसदेतील सभापती आणि उपसभापतींच्या विरोधात मुईझ्झू समर्थक पक्षांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे. याच अविश्वास प्रस्तावाच्या चालीला प्रत्युत्तर म्हणून अध्यक्षांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणला जाईल, असे या पक्षाच्या सूत्रांनी स्पष्ट केले. अशाप्रकारे दोन्ही बाजू परस्परांना दुर्बल बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत. येत्या काही दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होऊ शकते.