दहशतवादावर तडजोड मुळीच नाही!
पंतप्रधान मोदींच्या मलेशिया भेटीवेळी संयुक्त संदेश जारी : दोन दिवशीय दौऱ्यावरून माघारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, क्वालालंपूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी मलेशियाचा दोन दिवसांचा दौरा पूर्ण करून मायदेशी परतले. या दौऱ्यात त्यांनी चार प्रमुख मलेशियन व्यावसायिक नेत्यांशी भेट घेत भारतातील गुंतवणूक संधींबद्दल चर्चा केली. या चर्चेत भारत आणि मलेशियामधील वाढत्या व्यावसायिक संबंधांवर आणि भारतीय अर्थव्यवस्थेतील कंपन्यांच्या हितावर प्रकाश टाकण्यात आला. तसेच भारत आणि मलेशियाने सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध करताना त्याविरुद्ध शून्य-सहिष्णुता आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. दोन्ही पंतप्रधानांनी सीमापार दहशतवादासह सर्व दहशतवादी कारवाया नष्ट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्नांना तीव्र करण्याचे आवाहन केले.
पंतप्रधान मोदी शनिवारी दोन दिवसांच्या भेटीसाठी मलेशियात राजधानी क्वालालंपूर येथे पोहोचले. ऑगस्ट 2024 मध्ये दोन्ही देशांमधील संबंध व्यापक धोरणात्मक भागीदारीपर्यंत पोहोचल्यानंतर हा त्यांचा पहिलाच दौरा होता. तेथील भारतीय समुदायाला संबोधित करताना त्यांनी जग भारताला विकासासाठी एक विश्वासार्ह भागीदार म्हणून पाहते, असे सांगितले होते. ब्रिटन, अमेरिका आणि युरोपियन युनियनसह अनेक देशांसोबत अलिकडेच झालेले व्यापार करार या विश्वासाची उदाहरणे असल्याचे त्यांनी येथे स्पष्ट केले. दरम्यान, रविवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्यात महत्त्वाच्या चर्चा झाल्या. या बैठकीत अनेक सामंजस्य करारांवर (एमओयू) स्वाक्षऱ्याही करण्यात आल्या. मोदींनी भारतातील सुधारणा आणि व्यवसाय सुलभ करण्यासाठी स्थिर धोरणात्मक वातावरणावर प्रकाश टाकला. मलेशियन कंपन्यांना पायाभूत सुविधा, अक्षय ऊर्जा, डिजिटल तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर, एआय आणि आरोग्यसेवा यासारख्या क्षेत्रात संधी शोधण्याचे आमंत्रण दिले.
भारत-मलेशियात नवे ‘मैत्री’बंध
भारत-मलेशिया संबंध ‘इम्पॅक्ट’वर आधारित असून ते सामायिक बदल आणि विकासासाठी एक भागीदारी आहे. दोन्ही देश एकमेकांच्या यशाला स्वत:चे मानतात असे मोदी म्हणाले. मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनीही भारताचे वर्णन एक महत्त्वाचा व्यापारी भागीदार म्हणून केले. दोन्ही देशांमधील ऐतिहासिक संबंधांची आठवण करून देत मोदींना मित्र म्हटले.
द्विपक्षीय करारांवर स्वाक्षरी
भारत आणि मलेशिया यांच्या संयुक्त निवेदनात द्विपक्षीय संबंध पुढे नेण्यासाठी एक व्यापक रोडमॅपची रुपरेषा आखण्यात आली. दोन्ही देशांनी सेमीकंडक्टर, डिजिटल अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, ऊर्जा, आरोग्यसेवा, एआय आणि स्टार्टअप्स यासारख्या क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यावर भर दिला. द्विपक्षीय व्यापारात रुपया-रिंगिट पेमेंटला प्रोत्साहन देण्यास आणि आवश्यक कृषी उत्पादनांची पुरवठा साखळी मजबूत करण्यासही त्यांनी सहमती दर्शविली. मलेशियाने शाश्वत पाम तेलाचा पुरवठा सुरू ठेवण्याचे आश्वासन देखील दिले. डिजिटल सहकार्य वाढविण्यासाठी, मलेशिया-भारत डिजिटल कौन्सिल सुरू करण्यासाठी आणि सुलभ पेमेंट व्यवस्थेसाठी पावले उचलण्यात आली आहेत. अक्षय ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन आणि सौर प्रकल्पांमध्ये भागीदारीसह सेमीकंडक्टर मूल्य साखळी मजबूत करण्यासाठी देखील करार करण्यात आले.
विविध क्षेत्रांमध्ये एकमेकांना सहाय्य
संरक्षण आणि सुरक्षा आघाडीवर, सागरी सहकार्य आणि नौदल सराव वाढवण्यावर चर्चा झाली. दहशतवादावर शून्य-सहिष्णुता धोरणाचा पुनरुच्चार करताना सीमापार दहशतवाद, कट्टरतावाद आणि दहशतवादी निधीचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर समन्वय मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला. आरोग्य क्षेत्रात, आयुष प्रणालींना प्रोत्साहन देणे, परवडणारी औषधे आणि नर्सिंग सेवांमध्ये सहकार्य, पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापनात संयुक्त प्रशिक्षण आणि बिग कॅट कन्झर्वेशन इनिशिएटिव्हमध्ये भागीदारी यासारख्या मुद्यांवरही चर्चा करण्यात आली.
दहशतवादावर कडक भूमिका
भारत आणि मलेशियाने दहशतवादी कारवायांचा तीव्र निषेध करत त्याविरुद्ध शून्य-सहिष्णुता आवश्यक असल्याचे सांगितले. दोन्ही पंतप्रधानांनी सीमापार दहशतवादासह सर्व दहशतवादी कारवाया नष्ट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्नांना तीव्र करण्याचे आवाहन केले. कट्टरतावाद, हिंसक अतिरेकीपणा, दहशतवादी निधी आणि नवीन तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखण्यासाठी माहितीची देवाणघेवाण आणि क्षमता बांधणीवर सहकार्य मजबूत करण्यावरही सहमती झाली. दोन्ही देशांनी संघटित आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीशी संबंधांच्या गंभीर समस्येला देखील मान्यता दिली.
भारतीय समुदाय एक मजबूत पूल
मलेशियातील भारतीय समुदाय दोन्ही देशांमधील एक मजबूत पूल म्हणून काम करतो, असे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले. त्यांनी येथे नवीन वाणिज्य दूतावास उघडण्याची आणि विद्यार्थ्यांसाठी तिरुवल्लुवर शिष्यवृत्ती सुरू करण्याची घोषणा केली. भारताच्या जागतिक व्यापार संबंधांचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की, युएई, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि ओमान सारख्या देशांसोबत वाढत्या सहकार्यातून हे दिसून येते की विश्वास हा भारताचा सर्वात मोठा बलस्थान बनला आहे. मलेशियामध्ये सुमारे 30 लाख भारतीय वंशाच्या लोकांची उपस्थिती ही दोन्ही देशांमधील संबंधांची एक मोठी ताकद असल्याचे वर्णन करताना त्यांनी तामिळी भाषा आणि संस्कृतीची जागतिक मान्यता अधोरेखित केली.