जानेवारीपासून सिमकार्डसाठीचे नियम बदलणार
ठराविक लोकांनाच मिळणार नवीन सिम : दूरसंचार विभागाची अधिसूचना सादर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येत्या वर्षापासून नवीन सिमकार्ड खरेदी करण्याच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. हा बदल 1 जानेवारी 2024 पासून लागू होणार आहे. दूरसंचार विभागाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार नवीन वर्षापासून ई-केवायसीशिवाय नवीन सिम मिळणार नाही अशी माहिती आहे.
ई-केवायसी कोण करणार?
सिम खरेदीसाठी ई-केवायसी फक्त दूरसंचार विभागाकडून केले जाईल. याशिवाय इतर सर्व नियम तसेच राहतील. आतापर्यंत कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच नवीन सिमकार्ड मिळत होते. परंतु नवीन वर्षात ग्राहकांना कागदपत्रांच्या पडताळणीसाठी ई-केवायसी करावे लागणार आहे.
विक्रेत्यांचे सत्यापनदेखील आवश्यक आहे. दूरसंचार विभागाने ऑगस्ट महिन्यातच हे नियम जाहीर केले होते. मात्र त्यांची अंमलबजावणी करण्यास विलंब झाला. आता हे नियम नवीन वर्षापासून लागू होणार आहेत. ज्यामध्ये विक्रेत्यांनीही पडताळणी करणे आवश्यक आहे. जो ग्राहक सिम खरेदी करतो त्याची प्रथम बायोमेट्रिक पडताळणी केली जाईल. माहितीच्या पडताळणीनंतरच त्यांना सिमचे वाटप केले जाणार असल्याचे यावेळी सांगितले आहे.
जुन्या पद्धतींवर पूर्ण बंदी
सध्या फक्त कागदावर आधारित केवायसी केले जाते. मात्र नवीन वर्षापासून यावर पूर्ण बंदी येणार आहे. देशात डिजिटलायझेशन वाढत आहे. त्यामुळे ही यंत्रणा डिजिटल करण्याची योजना आखण्यात आली. एवढेच नाही तर पेपर केवायसीला खूप वेळ लागतो आणि ही एक महागडी प्रक्रियादेखील आहे. त्यामुळे ऑनलाइन केवायसी करून टेलिकॉम कंपन्यांचा खर्चही कमी होऊ शकतो.
हा नियम का लागू करण्यात आला?
मोठे गुन्हे आणि बनावट सिमद्वारे लोकांची फसवणूक करण्याची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. कागदावर आधारित सिम खरेदी करण्यासाठी सोपे नियम आणि विक्रेत्यांची वेळोवेळी पडताळणी न केल्यामुळे, बरेच लोक मोठ्या प्रमाणात सिम खरेदी करायचे आणि त्यांचा गैरवापर करायचे. अशा सर्व प्रकारची फसवणूक रोखण्याच्या उद्देशाने ई-केवायसीचा नियम लागू केला जात आहे. जेणेकरून बनावट क्रमांकाद्वारे होणारी फसवणूक थांबवता येणार असल्याचेही दूरसंचार विभागाने स्पष्ट केले.