टॅटूवरही येणार निर्बंध
राज्य सरकार करणार केंद्राला विनंती : नवा कायदा आणणार
प्रतिनिधी/ बेंगळूर
टॅटूसाठी वापरल्या जाणाऱ्या शाईपासून एचआयव्ही आणि त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका आहे. त्यामुळे राज्य सरकार टॅटूवर बंदी घालण्याची विनंती केंद्र सरकारकडे करणार आहे. राज्यात टॅटू काढणाऱ्यांसाठी आणि काढून घेणाऱ्यांना लागू होईल, असा नवा कायदा जारी करण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरु केल्या आहेत. नव्या कायद्याद्वारे सरकारकडून अशास्त्राrय आणि हव्या त्या पद्धतीने टॅटू काढण्यावर निर्बंध घातले जाण्याची शक्यता आहे.
राज्यात काही हॉटेल, स्ट्रीट फूड स्टॉल, उपाहारगृहांमध्ये इडली तयार करण्यासाठी प्लास्टिकचा वापर होत असल्याने त्यातून आरोग्याला धोका असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आरोग्य खात्याने हॉटेलमध्ये प्लास्टिकच्या वापरावर प्रतिबंध घालण्याची घोषणा केली आहे. या पाठोपाठ आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी टॅटूसंबंधी सरकारकडून ठोस पावले उचलली जाणार असल्याचे सांगितले आहे.
शुक्रवारी बेंगळूरमधील आरोग्यसौध येथे पत्रकार परिषदेत मंत्री दिनेश गुंडूराव म्हणाले, टॅटू शाईबाबत कोणतेही मानक नाहीत तसेच ते औषध आणि सौंदर्यप्रसाधने कायद्यांतर्गत येत नाहीत. टॅटू शाईतील रसायने आणि इतर घटक त्वचेद्वारे शरीरात प्रवेश करतात. यामुळे अनेक त्वचारोग उद्भवण्याची शक्यता आहे. या संदर्भात नियम बनविण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. टॅटू शाईला सौंदर्यप्रसाधने उत्पादने अंतर्गत आणण्यासाठी आणि बीआयएसनुसार निकष तयार करावेत.
देशात टॅटूसाठी कोणतेही नियंत्रण कायदे नाहीत. राज्य सरकार प्रथमच टॅटूसाठी नवीन नियम लागू करण्याच्या दिशेने प्रयत्नशील आहे. टॅटू काढून घेणाऱ्यांसाठी डॉक्टरांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र घेणे, टॅटू काढणाऱ्यांनी आरोग्य खात्याला ते वापरत असलेली शाई, रसायने, सुई व इतर सामुग्रीच्या स्वच्छतेविषयी माहिती देण्याची तरतूद असणारे नियम तयार केले जाण्याची शक्यता आहे.
टॅटूमुळे एचआयव्ही, कर्करोगाचा धोका
त्वचेचा कर्करोग, एचआयव्ही आणि त्वचारोग, हिपॅटायटीस बी, हिपॅटायटीस सी आणि स्टॅफिलोकोकस ऑरियस यासारखे प्राणघातक आजार लोकांमध्ये वाढत आहेत. याविषयी आरोग्य खात्याने तपासणी केली असता त्यामागचे कारण टॅटू असल्याचे आढळून आले. त्यामुळे सरकार नवीन कायदा लागू करण्यासाठी सरसावले आहे.
रंग वापरलेले हिरवे वाटाणे असुरक्षित
अन्न सुरक्षा खात्याने बेंगळूरमधील विविध भागातून हिरव्या वाटाण्याचे 36 नमुने जमा केले होते. त्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. तेथून अहवाल उपलब्ध झाला असून 36 पैकी 28 हून अधिक नमुने असुरक्षित असल्याचे आढळले आहे. वाटाणे हिरवे दिसण्यासाठी कृत्रिम रंग वापरला जातो. त्यामुळे सामान्य वाटाण्यापेक्षा हे वाटाणे अधिक हिरवे दिसतात. त्यामुळे ग्राहक त्याकडे आकर्षित होतात. परंतु, अशा वाटाण्यामुळे मूत्रपिंडावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कृत्रिम रंग वापरून वाटाणे विक्री करणाऱ्यांवर अन्न सुरक्षा विभाग कारवाई करण्याच्या तयारीत आहे.