संसदेत ‘ई-सिगारेट’वरून गदारोळ
तृणमूलच्या 3 खासदारांनी संसदेत ओढली ई-सिगारेट : भाजप खासदार अनुराग ठाकूर यांचा आरोप
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
लोकसभेत गुरुवारी भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी सभागृहात ई-सिगारेट ओढली जात असल्याचा आरोप केल्यावर खळबळ उडाली. ठाकूर यांनी स्वत:च्या आरोपात कुठल्याही खासदाराचा नामोल्लेख केला नसला तरीही त्यांनी तृणमूल काँग्रेसचे तीन खासदार यात सामील असल्याचे संकेत दिले आहेत. संसदेच्या कामकाजादरम्यान अशाप्रकारचे कृत्य नियमांच्या विरोधात असण्यासह सभागृहाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविणारे असल्याचे वक्तव्य ठाकूर यांनी केले आहे. तृणमूलचे हे तिन्ही खासदार मागील काही दिवसांपासून संसदेत ई-सिगारेट ओढत असल्याचा दावा करण्यात येत आहे.
देशातील कोट्यावधी लोक आकांक्षेसह या सभागृहाकडे पाहत असतात. याचमुळे येथे संसदीय शिस्तीच्या विरोधात असलेले कुठलेही वर्तन सहन केले जाऊ नये. ई-सिगारेट ओढण्याच्या मुद्द्याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात यावे आणि आवश्यकता असल्यास चौकशी करविण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशाप्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, असे अनुराग ठाकूर यांनी लोकसभा अध्यक्षांना उद्देशून म्हटले आहे. याप्रकरणी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या अनेक खासदारांनी केली आहे.
ठाकूर यांनी केलेल्या आरोपानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदेत कुठल्याही सदस्याला कुठल्याही प्रकारची सूट किंवा विशेषाधिकार देण्यात आला नसल्याचे स्पष्ट केले आहे. ई-सिगारेट, धूम्रपान किंवा कुठलेही प्रतिबंधित कृत्य करण्याची सूट नाही. सर्व खासदारांवर समान नियम लागू होतात आणि सभागृहाची प्रतिष्ठा राखणे प्रत्येक सदस्याची जबाबदारी आहे. अद्याप माझ्यासमोर कुठलीह औपचारिक तक्रार आलेली नाही, परंतु अशाप्रकारचे कृत्य झाल्याचा कुठलाही पुरावा मिळाल्यास नियमांनुसार कठोर कारवाई केली जाणार आहे. संसद हे लोकशाहीचे सर्वोच्च व्यासपीठ आहे. संसदेत बसणाऱ्या सर्व प्रतिनिधींनी जनतेच्या अपेक्षेनुरुप शिस्त आणि प्रतिष्ठा राखावी, असे लोकसभा अध्यक्षांनी म्हटले आहे.
आयसीएमआरचे संशोधन
आयसीएमआरनुसार ई-सिगारेटचा दररोज वापर हृदयाघाताचा धोका 79 टक्क्यांपर्यंत वाढवू शकतो. यात निकेल, टिन आणि शिसे यासारखे अवजड धातू आढळू येतात. हे धातू कॅन्सर, डीएनए हानी आणि फुफ्फुसांच्या गंभीर आजारांचे कारण ठरू शकतात.
ई-सिगारेटवर भारतात बंदी
भारत सरकारने ई-सिगारेटवर बंदी घातली आहे. हे उपकरण वेगाने युवा, खासकरून शालेय मुलांमध्ये लोकप्रिय ठरत होते, यामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे. ई-सिगारेट एका बॅटरीने संचालित होणारे इलेक्ट्रॉनिक उपकरण असुन ते निकोटिनयुक्त द्रव्याला तप्त करत वाफेत रुपांतरित करते आणि याला वापर करणारे लोक श्वासाद्वारे शरीरात घेतात. भारतात इलेक्ट्रॉनिक सिगारेटवर पूर्णपणे बंदी आहे, ही बंदी ‘इलेक्ट्रॉनिक सिगारेट निषेध अधिनियम 2019’च्या अंतर्गत लागू करण्यात आली आहे. याचे उत्पादन, विक्री, आयात, निर्यात आणि जाहिरात बेकायदेशीर असून याच्या उल्लंघनावर तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे. ई-सिगारेट हानिकारक नसल्याचा गैरसमज युवांमध्ये फैलावला होता, तर तज्ञांनुसार हे साधारण सिगारेटइतकेच धोकादायक असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2019 साली बंदीची घोषणा करत सांगितले हेते. ई-सिगारेटद्वारे काही युवा घातक ड्रग्जचे सेवन करू लागल्यानेही चिंता वाढली होती.