दोनपेक्षा जास्त मुले होण्यावर निर्बंध नकोत!
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिलेल्या एका निवाड्याने साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेतले. दोनपेक्षा अधिक मुले होण्यावर जे कायदेशीर निर्बंध आहेत ते आता योग्य नाहीत, असा मुद्दा न्यायालयाने मांडलेला आहे. भारताचा प्रजनन दर हा तीन वरून आता एक पूर्णांक नऊपर्यंत खाली उतरलेला आहे, ही धोक्याची घंटा आहे.
अवघ्या काही कालावधीमध्ये देशात वृद्धांची संख्या वाढेल आणि कामकाजी लोकसंख्या बरीच खाली उतरेल, अशी भीती व्यक्त केलेली आहे. काही वर्षांपूर्वी ‘हम दो हमारे दो’ अशी जाहिरात संपूर्ण देशभर केंद्र सरकारने कुटुंब कल्याण खात्यामार्फत केली होती. वाढती लोकसंख्या ही भारतासमोर फार मोठी चिंता आहे आणि त्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर काही वर्षांनी ‘हम दो हमारा एक’ अशा पद्धतीची घोषणा आणि प्रत्येक कुटुंबासाठी त्याचे पालन करा, अशी सूचना तथा विनंती करण्यात आली. त्यानंतर या घोषणेचे कायद्यात रूपांतर करण्यात आले आणि देशातील अनेक राज्यांमध्ये दोनपेक्षा अधिक मुले असलेल्यांना सार्वजनिक क्षेत्रामध्ये विशेषत: राजकारणामध्येदेखील बंदी घालण्यात आली. आज देशाची लोकसंख्या 140 कोटी आहे आणि त्यामध्ये वाढ होत असली तरी जुन्या जाणत्या मंडळींची संख्या ही बऱ्यापैकी वाढत आहे. सर्वोच्च न्यायालयाला भविष्याची चिंता वाटते आणि ही चिंता वाटणे साहजिकच शक्य आहे. न्यायालय म्हणते की, गेल्या काही दशकांमध्ये लोकसंख्येच्याबाबतीत परिस्थिती बदलत आहे. त्यामुळे लोकसंख्या वाढीची भीती आता या कायद्याचा आधार राहिलेली नाही. नव्याने येणारी लोकसंख्या आणि अगोदरची लोकसंख्या यांचा विचार करता अगोदरची जुनी माणसे हळूहळू मरतात त्यांच्या जागी दुसरी पिढी जी तयार होणे आवश्यक आहे. त्यांची संख्या अलीकडच्या काळात कमी होत आहे. सर्वोच्च न्यायालयाची ही चिंता साऱ्या देशाला विचार करायला लावत आहे. खरोखरच देशातील सर्व राज्यांतील सरकारांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या सूचनेवर जरूर विचार करावा. कारण प्रजनन संख्या बदल प्रमाण तीन वरून आता एक पूर्णांक नऊपर्यंत खाली आलेला आहे. याचा देशाच्या भविष्यावर परिणाम तर होणार नाही ना हे पाहावे लागेल. देशातील 7 राज्यांनी दोन मुलांची घातलेली अट रद्द केली आहे तर 15 राज्यांमध्ये अशा प्रकारचे धोरणच नाही. आसाम, गोवा, गुजरात, महाराष्ट्र, ओडिसा आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये मात्र सध्या हा नियम लागू आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायालयाने नियुक्त केलेल्या अमिकस क्युरी ऊक्मिणी बोबडे यांनी ही माहिती न्यायालयाला सादर करून यावर फेरविचार करायला भाग पाडले आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारलादेखील आता दोनपेक्षा जास्त मुले असणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करू नका, असा सल्लाच दिलेला आहे. महाराष्ट्रातील काकोडा ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच मंगला भीमराव यांना महाराष्ट्र सरकारच्या नियमानुसार दोनपेक्षा जास्त मुले असल्याने सरपंचपदावरून अपात्र ठरविण्यात आले होते. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी आलेल्या तक्रारीनंतर तिला अपात्र केले. तिने अतिरिक्त आयुक्तांकडे अपील केले मात्र त्यांनीही त्यांचे अपील फेटाळून लावले. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात 5
ऑगस्ट 2025 रोजी त्यांनी केलेल्या आव्हान अर्जावर न्यायालयाने त्यांच्या अपात्रतेवर शिक्कामोर्तब केले. मंगला गप्प बसल्या नाहीत. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आणि 4 नोव्हेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निवाड्याला स्थगिती दिली. आता सर्वोच्च न्यायालयाने मंगला भीमराव यांची अपात्रता रद्द केली. बदलत्या परिस्थितीनुसार आता हम दो हमारे दो किंवा हमारा एक हे करणे परवडणार नाही. अलीकडे बदलत्या सवयी, आहारावर नियंत्रण नसल्यामुळे अनेकांना मुले होत नाहीत. मुले व्हावीत यासाठी अनेक जण वेगवेगळ्या प्रकारची औषधे घेतात, त्याचा शरीरावर परिणाम होतो. ही, परिस्थिती देखील विचार करण्यासारखी आहे. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने जो निवाडा दिला तो राजकारणात उतरणाऱ्यांना दोनपेक्षा जास्त मुले असलेल्यांना आता अपात्र करता येणार नाही असा जरी दिला असला तरी देखील आता ‘हम दो, हमारे दो’ सक्तीचे करता येणार नाही हे निश्चित. देशातील लोकसंख्या वाढतेय असे एका बाजूने दिसतेय खरे, परंतु दुसऱ्या बाजूने ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत चाललीय आणि नव्याने जन्माला येणाऱ्यांची संख्या ही त्या तुलनेत कमी होत चाललेली आहे. जगातील सर्वाधिक युवा संख्या असलेला देश म्हणजे भारत हे आपण जरी मान्य करीत असलो तरी देशाची एकंदरित लोकसंख्या आणि त्यात नव्याने जन्माला येणाऱ्यांची संख्या यांचा विचार करता तफावत वाढत आहे. संभाव्य परिस्थितीचा विचार करता सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निवाडा हा केवळ राजकारणाशी संबंधित मर्यादित नाही त्याची व्यापकता लक्षात घेणे तेवढेच गरजेचे आहे. आज अनेक युरोपियन राष्ट्रांमध्ये नव्याने जन्माला येणाऱ्या मुलांची संख्या फार कमी होत चालली आहे. अनेक देशांमध्ये असेच प्रकार आहेत.
