For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दहशतवादासंबंधी दुतोंडीपणा नकोच

07:10 AM Sep 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
दहशतवादासंबंधी दुतोंडीपणा नकोच
Advertisement

एससीओ परिषदेत पंतप्रधान मोदी यांची स्पष्टोक्ती  : सुरक्षा, कनेक्टिव्हिटी अन् संधी या त्रिसूत्रीवर एससीओने कार्य पुढे न्यावे

Advertisement

पंतप्रधान मोदी यांची ठाम भूमिका

  • दहशतवादाविषयी बोटचेपी भूमिका जगासाठी निश्चितपणे घातक ठरणार
  • कोणतीही निमित्ते पुढे न करता दहशतवादाविरोधात एकत्र संघर्ष आवश्यक
  • पंतप्रधान मोदी, क्षी जिनपिंग आणि व्लादिमीर पुतिन दिसून आले एकत्र

वृत्तसंस्था/बिष्केक (किर्गिस्तान)

Advertisement

दहशतवादाविरोधात संपूर्ण जगाने एकमुखी भूमिका घेणे आवश्यक आहे. या संदर्भात कोणताही दुतोंडीपणा कोणी करू नये, असे ठोस प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (एससीओ) शिखर परिषदेत त्यांनी ही स्पष्टोक्ती केली. दहशतवादाविरोधात एकात्म पद्धतीने संघर्ष अत्यावश्यक असून कोणीही कोणतीही निमित्ते सांगू नयेत, अशी भारताची ठाम धारणा आहे. दहशतवादाचे संकट दुर्लक्षिण्याजोगे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाच्या वेळी पाकिस्तानचे नेते शहाबाझ शरीफ श्रोत्यांमध्ये बसून होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादासंबंधीचा उल्लेख अप्रत्यक्षरित्या पाकिस्तानलाच उद्देशून केला होता. एससीओ संघटनेच्या सर्व सदस्य देशांनी दहशतवादाचा भस्मासूर गाडण्यासाठी, तसेच या संकटाला साहाय्यभूत ठरणारी संपूर्ण इकोसिस्टिम नष्ट करण्यासाठी एकत्रितरित्या काम करण्याची आवश्यकता आहे. तसेच दहशतवादाची आर्थिक नाळ तोडली पाहिजे. दहशतवाद्यांची भरती करणारी, धर्मांधतेचा प्रसार करून युवकांना बहकविणारी आणि दहशतवादाला आधार देणारी यंत्रणा सर्वांनी मिळून तोडली पाहिजे. सर्व सदस्य देशांनी यासाठी एकत्रित कृती करावयास हवी, असे प्रतिपादन त्यांनी केले.

एससीओसाठी भारताची त्रिसूत्री

शांघाय कोऑपरेशन संघटनेने सुरक्षा, कनेक्टिव्हिटी आणि संधी अशी महत्त्वाची त्रिसूत्री त्यांनी भारताच्या वतीने दिली. सुरक्षेसाठी दहशतवादाविरोधात एकात्म कृती आवश्यक आहे. तसेच कोणतीही समस्या युद्धाने सुटत नाही. सर्व युद्धे आणि विवाद संवाद आणि सामोपचार यांच्या माध्यमातून सोडविण्याची आवश्यकता आहे. तसेच व्यापार वाढविण्यासाठी सर्व बाजारपेठा एकमेकींशी जोडल्या जाण्याची आवश्यकता आहे. व्यापाराची नवी क्षेत्रे शोधून काढणे आणि विकासाच्या नव्या संधी निर्माण करण्याचीही आवश्यकता आहे. मात्र, कनेक्टिव्हिटीची ही उद्दिष्ट्यो साध्य करताना सर्व देशांचे सार्वभौमत्व आणि भौमिक एकात्मता सुनिश्चित होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. बाजारपेठांची जोडणी, व्यापारासाठी प्रोत्साहन आणि विकासाच्या नव्या मार्गांचा शोध यांसाठी भारताचे पूर्ण समर्थन असून भारत पुढाकार घेण्यास सज्ज आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

श्रेष्ठ संस्कृतींचा संगम

जगातील प्राचीन, महान आणि बहुविध अशा संस्कृतींचा संगम एससीओच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे एसीसीओच्या सदस्य देशांच्या लोकांमध्ये एकमेकांशी संपर्क निर्माण झाला पाहिजे. या संघटनेच्या सदस्य देशांनी पुढची सलग 25 वर्षे परस्पर जनतासंपर्काला प्राधान्य द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

पंतप्रधान मोदी, पुतिन, जिनपिंग एकत्र भेट

परिषदेच्या एकत्रित छायाचित्राच्या कार्यक्रमापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि अध्यक्ष व्लादिमिर पुतिन एकत्र दिसून आले. त्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले आणि काही काळ संवाद केला. सध्याच्या अस्थिर जागतिक परिस्थितीत त्यांचे जाहीररित्या एकत्र येणे ही घटना महत्त्वाची मानण्यात येत आहे.

शरीफ धावले पुतिन यांच्यामागे

संयुक्त छायाचित्राच्या कार्यक्रमानंतर रशियाचे अध्यक्ष पुतिन जाण्यास निघाले, त्यावेळी एक स्वारस्यपूर्ण प्रसंग घडला. पाकिस्तानचे नेते शहाबाझ शरीफ पुतीन यांच्यामागे धावल्याचे दिसून आले. त्यांनी पुतिन यांचा हात पकडून थांबण्याची विनंती केल्याचेही पहावयास मिळाले. पुतिन यांनी त्यांच्याकडे वळून पाहिले आणि थांबून काही क्षण त्यांच्याशी संवाद केला. या प्रसंगाची सध्या चर्चा होत आहे.

Advertisement
Tags :

.