For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘त्या’ शस्त्रक्रियेत बिम्स डॉक्टरांची कोणतीही चूक नाही!

10:46 AM Dec 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘त्या’ शस्त्रक्रियेत बिम्स डॉक्टरांची कोणतीही चूक नाही
Advertisement

वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील यांची विधानपरिषदेत माहिती : विरोधी सदस्यांच्या आरोपावर स्पष्टीकरण

Advertisement

बेळगाव : काही दिवसांपूर्वी बिम्समध्ये शस्त्रक्रियेच्या नावाखाली गोंधळ निर्माण झाला होता. एका युवकाला आजार होता एक, तर शस्त्रक्रिया केली दुसरीच, असा आरोप बिम्समधील डॉक्टरांवर करण्यात आला होता. बिम्समधील डॉक्टरांनी सदर युवकावर आजाराचे निदान झाल्यानंतरच योग्य शस्त्रक्रिया केली असून यामध्ये डॉक्टरांची कोणतीही चूक नाही. शस्त्रक्रियेनंतर सदर युवकाला दुसरा आजार असल्याचेही एका खासगी हॉस्पिटलमध्ये निष्पन्न झाले होते. तेथे त्याच्यावर त्या आजारावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. बिम्स हॉस्पिटल हे राज्यात एक आदर्श असे हॉस्पिटल आहे. यामुळे या प्रकरणात जाणीवपूर्वक बिम्सच्या डॉक्टरांना ओढण्यात आले आहे, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य एम. नागराजू यांनी बिम्समधील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे युवकाचा जीव धोक्यात आला होता. त्याच्या अपेंडिक्सवर शस्त्रक्रिया करण्याऐवजी त्याचे आतडे काढून टाकण्यात आले होते. यामध्ये सर्वस्वी बिम्सचे डॉक्टरच जबाबदार असल्याचा आरोप केला. त्याचबरोबर गेल्या तीन वर्षांत अशा प्रकारच्या घटना घडत आल्या असून बिम्समध्ये सावळा गोंधळ सुरू आहे. यावर सरकारने कोणती कारवाई केली? बिम्समध्ये कॅन्सर हॉस्पिटल निर्माण करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. मात्र अद्याप याची कार्यवाही कार करण्यात आली नाही, असा प्रश्नही नागराजू यांनी उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना मंत्री पाटील म्हणाले, सदर युवकाच्या शस्त्रक्रिया प्रकरणाची त्वािरत माहिती जाणून घेतली होती. या घटनेच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली होती.

Advertisement

समितीद्वारे माहिती घेतली असता सदर रुग्ण दीर्घकाळापासून मद्यपान व तंबाखूचे सेवन करीत असल्याचे आढळून आले. तालुका हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी व इतर तपासणी केल्या असता सदर युवकाला अपेंडिक्स असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर सदर युवकाला शस्त्रक्रियेसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. युवकाला अपेंडिकक्युलर छिद्र असल्याचे आढळून आले. शस्त्रक्रियेदरम्यान अपेंडिक्सला सूज असल्याने त्याच्यावर अपेंडेटॉमी करण्यात आली. या शस्त्रक्रियेदरम्यान आतड्यांची तपासणी केली असता आतडे सामान्य असल्याचे दिसून आले. यामुळे आतड्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली नाही. शस्त्रक्रियेनंतर सदर युवकाला पुन्हा मोठ्या प्रमाणात वेदना जाणवू लागल्या. त्यामुळे सदर युवकाचे कुटुंबीय त्याला डॉक्टरांच्या सल्ल्याविना

हॉस्पिटलमधून घेऊन गेले. मात्र बिम्समधील डॉक्टरांनीच युवकाला खासगी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा सल्ला दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामध्ये बिम्समधील डॉक्टरांची काहीही चूक नसून विनाकारण त्यांना या प्रकरणात गोवण्यात आले आहे. या घटनेचा तपास करीत असताना सदर युवकाचे खासगी हॉस्पिटलमध्ये स्कॅनिंग करण्यात आले. यावेळी आतड्यांमध्ये दोष असल्याचे आढळून आले होते. यामुळे खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सदर युवकाच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. कुटुंबीयांच्या परवानगीनंतरच युवकावर दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली असून यामध्ये बिम्समधील एकाही डॉक्टर किंवा कर्मचाऱ्यांचा सहभाग नसल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.

राज्य सरकारने कोट्यावधी रुपये खर्च करून बेळगावमध्ये सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल निर्माण केले. तेथे सर्व सुविधा पुरविण्यात येत आहेत. निधी, सुविधा राज्य सरकारच्या असूनही खासगी संस्थेला सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल चालविण्यासाठी दिले गेले आहे का? असा प्रश्न सदस्य प्रकाश हुक्केरी व नागराजू यांनी उपस्थित केला. याला उत्तर देताना मंत्री डॉ. पाटील म्हणाले, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल कोणत्याही खासगी संस्थेला चालविण्यासाठी देण्यात आलेले नाही. जे डॉक्टर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नाहीत. केवळ तिच सेवा सदर संस्थेकडून पुरविण्यात येत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.