For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

या जगामध्ये आत्मज्ञानासारखे पवित्र दुसरे काही नाही

06:03 AM Feb 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
या जगामध्ये आत्मज्ञानासारखे पवित्र दुसरे काही नाही
Advertisement

अध्याय चौथा

Advertisement

भगवंत म्हणाले, ज्याला आत्मज्ञान प्राप्त होते त्याची पूर्वीची सर्व पापे जळून नष्ट होतात आणि हे विश्व खरे आहे हा त्याला झालेला भ्रम नाहीसा होतो. ह्यातील पूर्वीची पापे कशी नाहीशी होतात ह्याबद्दल सांगताना भगवंत म्हणाले, ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी लाकडांना भस्मसात् करतो, त्याप्रमाणे परमात्मज्ञानस्वरूप दिव्य अग्नी हा सर्व प्रकारचे कर्मबंध जाळून टाकतो. ह्या अर्थाचा

संपूर्ण पेटला अग्नि काष्ठे जाळूनि टाकितो । तसा ज्ञानाग्नि तो सर्व कर्मे जाळूनि टाकितो ।। 37 ।।

Advertisement

हा श्लोक आपण पहात आहोत. त्यानुसार ज्या पूर्वकर्माची भली, वाईट फळे भोगायचा काळ चालू जन्मात आलेला असतो ते भोग त्याला भोगावे लागतात परंतु ज्या पूर्वकर्माचे म्हणजे संचिताचे फळ मिळायची वेळ ह्या जन्मात येणार नसते त्या कर्मापासून तयार होणारे प्रारब्धभोग त्याला प्राप्त झालेल्या आत्मज्ञानाच्या धगीत जळून नष्ट होतात. ह्या जन्मी तो प्रारब्धानुसार जी कर्मे करत असतो त्याचे फळ तो कर्मयोगाचे आचरण करत असल्याने ईश्वराला अर्पण करतो. साहजिकच त्या कर्मापासून तयार होणारे पाप, पुण्य भोगण्यासाठी त्याला पुनर्जन्म घ्यावा लागत नाही.

आत्मज्ञानाच्या अग्नीचे महत्त्व सांगताना माउली आत्मज्ञानाच्या धगीची तुलना प्रलयकाळाशी करतात. प्रलयकाळ म्हणजे हे संपूर्ण विश्व नष्ट होताना जी विलक्षण उलथापालथ होत असते तो काळ. त्यावेळी प्रचंड वेगाने वारा वहात असतो. धुळीचे लोटच्या लोट आकाशात उडतात. तो संदर्भ देऊन माउली म्हणतात, प्रलयकाळची वावटळ ही त्रैलोक्याची राख आकाशात उडवून देणारी असते. तिच्यापुढे ढग कुठून टिकणार, अथवा ज्याप्रमाणे वाऱ्याच्या क्षोभाने भडकणारा प्रलयकाळचा अग्नी सर्व जाळून भस्म करतो त्याप्रमाणे आत्मज्ञानाचा अग्नी एकदा धडधडून पेटला की त्यात साधकाचे प्रारब्ध पाल्यापाचोळ्याप्रमाणे जळून जाते. त्यामुळे आत्मज्ञान प्राप्त झालेल्या साधकाचे कर्मबंधन तुटून तो जन्ममरणाच्या चक्रातून मुक्त होतो. जोपर्यंत त्याचे आयुष्य असते तोपर्यंत लोककल्याणकारी कार्ये करत असताना चालू जन्मातील वाट्याला आलेले भोग तो भोगून संपवतो.

पुढील श्लोकात भगवंत सांगतात, या जगामध्ये आत्मज्ञानासारखे पवित्र दुसरे काही नाही. ते ज्ञान मिळण्यासाठी कर्मयोग साधकाच्या अंगवळणी पडला की, त्याच्या हातून निरपेक्षतेने कर्म आपोआप होऊ लागते. असे झाले की, सद्गुरूंच्या उपदेशाने तो कर्मयोगयुक्त होतो आणि योग्यवेळी ज्ञान त्याच्यात प्रकट होते.

ज्ञानासम नसे काही पवित्र दुसरे जगी । योग-युक्त यथा-काळी ते पावे अंतरी स्वये ।। 38 ।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, ज्ञानाने दोष नाहीसे होतात यात शंकाच नाही. ज्ञानाचा जो जो विचार करावा, तो तो असे दिसून येते की, आत्मज्ञानाच्या योग्यतेची परमपवित्र वस्तू जगात दुसरी कोणतीही नाही. या जगात चैतन्याला तोड नाही त्याप्रमाणे आत्मज्ञानालाही तोड नाही. ज्ञानाशी तुलना करता येईल अशी कोणतीच वस्तू जगात उपलब्ध नाही. ज्ञानाचे महत्त्व मनावर ठसवण्यासाठी माउली काही अशक्यप्राय गोष्टी सांगून त्या जर प्रत्यक्ष उतरल्या तर ज्ञानाशी तुलना करता येईल अशी वस्तू उपलब्ध होईल असे सांगतात. ते म्हणतात, जर सूर्याच्या तेजाची कल्पना करता आली किंवा आकाशाला दोन्ही हातानी कवटाळता येऊ शकले अथवा, पृथ्वीच्या तोलाचे जर कांही मिळाले तरच अर्जुना, ज्ञानाला उपमा देता येईल.

क्रमश:

Advertisement
Tags :

.