For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आत्मज्ञानाशी तुलना करता येईल अशी कोणतीच वस्तू जगात नाही

12:05 AM Feb 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
आत्मज्ञानाशी तुलना करता येईल अशी कोणतीच वस्तू जगात नाही
Advertisement

अध्याय चौथा

Advertisement

भगवंत अर्जुनाला म्हणाले, या जगामध्ये आत्मज्ञानासारखे पवित्र दुसरे काही नाही. ते ज्ञान मिळण्यासाठी कर्मयोग साधकाच्या अंगवळणी पडणे आवश्यक आहे. असे झाले की, त्याच्या हातून निरपेक्षतेने कर्म आपोआप होऊ लागते. असे झाले की, सद्गुरूंच्या उपदेशाने तो कर्मयोग आचरू लागतो आणि योग्यवेळी त्याच्यात आधीपासूनच असलेले ज्ञान प्रकट होते. त्यामुळे दोष नाहीसे होतात यात शंका नाही. आत्मज्ञानाचा जो जो विचार करावा, तो तो असे दिसून येते की, त्याच्या योग्यतेची परमपवित्र वस्तू जगात दुसरी कोणतीही नाही. या जगात चैतन्याप्रमाणे आत्मज्ञानालाही तोड नाही. त्याच्याशी तुलना करता येईल अशी कोणतीच वस्तू जगात उपलब्ध नाही. जर सूर्याच्या तेजाची कल्पना करता आली किंवा आकाशाला दोन्ही हातानी कवटाळता येऊ शकले अथवा, पृथ्वीच्या तोलाचे जर कांही मिळाले तरच अर्जुना, ज्ञानाला उपमा मिळेल. वरील पैकी कोणत्याही गोष्टी होणे शक्य नसल्याने ज्ञानाशी कुणाची तुलना होणं अशक्यच आहे. म्हणून ज्याप्रमाणे अमृताची चव ही इतर कोणत्याही रसापेक्षा सरस असल्याने ती अमृतासारखीच आहे, असे म्हणावे लागते, त्याप्रमाणे ज्ञानाला ज्ञानाचीच उपमा देणे भाग पडते. आता यापेक्षा ज्ञानाचे अधिक महत्त्व सांगणे म्हणजे व्यर्थ वेळ घालविणे होय.

ह्या श्लोकात ज्ञानाचे सांगितलेले महत्त्व ऐकल्यावर अर्जुनाच्या मनात असा विचार आला की, देव जे सांगत आहेत ते पटण्यासारखेच आहे पण ते ज्ञान मिळवायचे कसे? अर्जुनाचे मनोगत देवांनी जाणले. जेव्हा दोघांची मने एकरूप झालेली असतात तेव्हा त्या दोन व्यक्ती वेगवेगळ्या दिसत असल्या तरी त्यांना एकमेकांच्या मनातले लगेच उमगते. श्रीकृष्ण आणि अर्जुन तर मनाने केव्हाच एकरूप झालेले होते. त्यामुळे अर्जुनाच्या मनातले विचार भगवंतानी लगेच वाचले. आत्मज्ञान कसे मिळवायचे हा खरं बघितलं तर प्रत्येकाच्या मनातलाच प्रश्न असल्याने भगवंत अर्जुनाला सांगण्याच्या बहाण्याने सगळ्यांसाठीच त्याचे उत्तर देत आहेत. ते म्हणाले, आता मी सांगतो त्या गोष्टीकडे नीट लक्ष दे. ज्ञानप्राप्तीचा उपाय मी तुला आता सांगणार आहे.

Advertisement

भगवंतांनी पुढील श्लोकात भगवंत सांगतात. श्रद्धावान, इंद्रिय जिंकलेल्या, ज्ञानसाधनेत तत्पर असलेल्या पुरुषाला ज्ञान प्राप्त होते. त्या ज्ञानाने त्याला भगवतप्राप्तीच्या रूपाने परमशांती लाभते.

श्रद्धेने मेळवी ज्ञान संयमी नित्य सावध । ज्ञानाने शीघ्र तो पावे शांति शेवटची मग ।।39 ।।

श्लोकाच्या विवरणात माऊली म्हणाले, श्रद्धेचे महत्त्व भगवंत ह्या श्लोकात सांगत आहेत. ते म्हणतात, आत्मज्ञान मिळवण्यासाठी मनुष्य फार बुद्धिमान असण्याची गरज नाही. बुद्धिमान मनुष्य एकवेळ व्यवहारात यशस्वी ठरेल पण आत्मज्ञान मिळवण्यासाठी माणसाला सद्गुरूंच्या वचनावर नितांत श्रद्धा असणे आवश्यक आहे. त्याची श्रद्धा जेव्हढी घनिष्ट असेल तेव्हढ्या प्रमाणात त्याच्या हातून त्यांच्या उपदेशाचे पालन होऊ शकेल. परमार्थाच्या प्राप्तीकरिता सद्गुरूंचा आश्रय हा मूलाधार असतो. त्यांच्या आश्रयाला गेलं की, आपोआप कर्मयोगाचे आचरण हातून घडू लागते. सद्गुरुंच्या कृपेने इच्छा मावळल्या, वैयक्तिक सुखाची कल्पना नाहीशी झाली म्हणजे परमात्म्याचा मंगलरूप अनंत आनंद हृदयात स्फुरू लागतो. त्याची एकनिष्ठ भक्ती पाहून सद्गुरू त्याला आशीर्वाद देतात आणि त्याचे फळ म्हणून त्याच्यात आधीपासून असलेले आत्मज्ञान प्रकट होते.

क्रमश:

Advertisement
Tags :

.