For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आत्मज्ञानापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही

06:26 AM Feb 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
आत्मज्ञानापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही
Advertisement

अध्याय चौथा

Advertisement

भगवंत म्हणाले, सर्व प्रकारच्या द्रव्यसाधनांनी साध्य होणाऱ्या यज्ञापेक्षा “ज्ञानयज्ञ” श्रेष्ठ आहे कारण सर्व प्रकारची कर्मे शेवटी ज्ञानामध्येच समाप्त होत असतात. ज्ञानयज्ञ हा चालू जन्माच्या कर्माच्या समाप्तीचे ठिकाण आहे. जो ज्ञानयज्ञ करत असतो त्याच्या मनात समोरच्याचे कल्याण व्हावे एव्हढा एकच हेतू असल्याने त्याचे मन स्वच्छ असते. त्रिगुणांच्या पलीकडे गेल्याने त्याला सर्व विश्व ब्रह्मव्याप्त असल्याचे अनुभवास येत असते. माणसाने नुसते मनाने ठरवून त्याच्या हातून कर्मयोगाचे आचरण घडत नाही. त्यासाठी सद्गुरूंना शरण जावे लागते.

पुढील श्लोकात सद्गुरूंनी कसे शरण जावे ते भगवंत सांगत आहेत. ते म्हणाले, माणसाने सद्गुरुना साष्टांग नमस्कार करून, मनोभावे त्यांची सेवा करावी. निष्कपट भावनेने त्यांना प्रश्न विचारून आत्मज्ञान समजून घ्यावे. आत्मतत्व जाणणारे ज्ञानी पुरुष ज्ञानाचा उपदेश करतात.

Advertisement

सेवा करून ते जाण नम्र-भावे पुसूनिया । ज्ञानोपदेश देतील ज्ञानी अनुभवी तुज ।।34।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, ते सर्वश्रेष्ठ ज्ञान आपल्याला प्राप्त व्हावे असे मनात असेल, तर संतांना सर्वभावाने भजावे. हे संत म्हणजे ज्ञानाचे घर आहेत आणि सेवा हा त्यांच्या घराचा उंबरठा आहे. हे अर्जुना! संतांची मनोभावे सेवा करावी. संतासेवा म्हणजे त्यांची शारीरिक सेवा नव्हे तर ते सांगतील त्याप्रमाणे वागून दाखवणे होय. त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागून त्यांना आपलेसे कर. शरीराने, मनाने आणि जीवाने त्यांच्या चरणी लागावे. सर्व प्रकारचा अभिमान सोडून त्यांचे दास्य करावे. ज्या आत्मज्ञानाची आपणास अपेक्षा असते, त्यासंबंधी आपण प्रश्न केला, तर त्याचे उत्तर संत सांगतात, ते ज्ञान आपल्या अंत:करणात बिंबले जाते आणि मनात संकल्प निर्माण होत नाहीत.

दृश्य जगाचा मोह पडू लागला की माणसाला आत्मस्वरूपाचा विसर पडतो आणि दुसरं म्हणजे जोपर्यंत आत्मज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत असा मोह माणसाला वारंवार होत असतो. ह्या मोहामुळे मनुष्य हा आपला तो परका असा फरक करत असतो आणि त्यात आपण काही चूक करतोय असेही त्याला वाटत नाही. म्हणून प्रत्येकवेळी माणसाने मनात एखादा विचार आला की, त्यावर कृती करण्याअगोदर आपल्या हातून कुणाला झुकते माप दिले जात नाहीये ना, ह्याची खात्री करावी आणि मगच कृती करावी म्हणजे ते विवेकबुद्धीला धरून होईल. अशावेळी कदाचित कुणाचा रोषही पत्करावा लागेल पण ती कृती न्यायाची असल्याने ती केल्याचा दोष लागणार नाही.

पुढील श्लोकात आत्मज्ञानाचे महत्त्व सांगताना भगवंत म्हणाले, आत्मज्ञान झाले की, तुला स्वत:मधील आणि इतर सर्वांच्यातील माझे अस्तित्व जाणवू लागेल आणि त्यामुळे हा आपला तो परका असे विचार तुझ्या मनात येणार नाहीत.

ज्या ज्ञानाने असा मोह न पुन्हा पावशील तू । आत्म्यात आणि माझात भूते नि:शेष देखुनी ।। 35।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतानी असं सांगितलंय की, अर्जुना संतांच्या उपदेशरूपी उजेडाने चित्त निर्भय आणि शंकारहीत होते. असे झाले की, तू तुझ्यासह सर्व भूतांना भगवंताच्या स्वरूपात निरंतर पाहशील. अशी दृष्टी प्राप्त होण्यासाठी सद्गुरूंची कृपा होणं अत्यंत आवश्यक आहे. ती झाल्यावर तुझ्या अंत:करणात ज्ञानाच्या प्रकाशाचा उदय होईल. त्यामुळे मोहरूपी अंधार नाहीसा होईल.

क्रमश:

Advertisement
Tags :

.