कोणतेच काम नसते तिरस्करणीय...
कोणतेही काम कधीच हलके किंवा कमी प्रतीचे नसते, असे शास्त्रवचन आहे. जे काम प्रामाणिकपणाने आणि जीव ओतून केले जाते, ते श्रेष्ठ आणि उपयुक्तच असते हे निर्विवाद आहे. तथापि, काही कामे अशी असतात की ज्यांच्यसंबंधी अगदी पुढारलेल्या देशांमध्येही सर्वसामान्यांच्या मनात तिटकारा असतो. जगातील बहुतेकांना प्रतिष्ठेची कामे हवी असतात. त्यामुळे अशा हलक्या समजल्या जाणाऱ्या कामांना आपले करिअर बनविण्याची इच्छा कोणाचीही नसते.
अशाच तिरस्करणीय मानल्या गेलेल्या कामातून आपले करीअर घडविणारी आणि कोट्यावधी रुपये कमाविणारी एक महिला फिनलंड या देशात असून तिने एकप्रकारे साऱ्या जगासमोरच आदर्श ठेवला आहे, असे म्हणावयास प्रत्यवाय नाही. या महिलेचे नाव ऑरी कनानन असे असून तिने घरे स्वच्छ करुन देण्याचा व्यवसाय आपले करीअर म्हणून निवडला आहे. मात्र, ती सर्वसामान्य घरे स्वच्छ करत नाही. तर अतिशय घाणेरडी आणि वर्षानुवर्षे कोणीही न राहिलेली तसेच न उपयोगात आणलेली घरे ती स्वच्छ करुन देते. आपल्याला वाटेल की यात आश्चर्य काय आहे ? अशी कित्येक माणसे आपल्या देशातही आहेत.
पण या महिलेचे वैशिष्ट्या असे की तिने कोरोना उद्रेकाच्या काळात या व्यवसायाचा प्रारंभ केला. कोरोनाची लोकांच्या मनात इतकी होती, की कोरोनाबाधित व्यक्ती राहिलेल्या घरांमध्येही कोणी जाण्याचे धाडस करीत नव्हते. मात्र या महिलेने अशा वाळीत टाकलेल्या घरांच्या स्वच्छतेचे काम स्वीकारले आणि पाहता पाहता तिचे हे करीअर बहरले. तिने गेल्या तीन-चार वर्षांमध्ये कोट्यावधी रुपयांची कमाई केली आहे. कोरोनाबाधित व्यक्ती वास्तव्यास असलेल्या घरांमध्ये, ती घरे पूर्णत: निर्जंतुक आणि स्वच्छ करुन घेतल्याशिवाय जाणे फिनलंड किवा युरोपात आजही लोक टाळतात. इतकी धास्ती तेथील लोकांच्या मनात बसली आहे. ही धास्ती हे या युवतीच्या व्यवसायाचे भांडवल आहे, असे दिसते.