म्हादई अभयारण्यात वाघ नाहीच
व्हायरल व्हिडिओ तीन वर्षांपूर्वीचा : गोवा वन्य जीव मंडळाचा दावा
पणजी : म्हादई अभयारण्यात वाघ नसल्याचा दावा वन खात्यातर्फे करण्यात आला असून समाजमाध्यमातून प्रसारित होत असलेला व्हिडिओ नवीन नाही तर तीन वर्षापूर्वीचा जुना असल्याचा खुलासा वन्यजीवन मंडळाच्या वॉर्डनने केला आहे. मंडळाचे प्रमुख वॉर्डन उमाकांत यांनी सांगितले की, समाजमाध्यमातून फिरत असलेल्या व्हिडिओची तपासणी केली असता तो जुना असल्याचे दिसून आले. तीन वर्षापूर्वीचा हा व्हिडिओ पुन्हा प्रसारित करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी संबंधित गावातील ग्रामस्थांकडे चौकशी केली असता तेथे वाघ नसल्याचे सांगण्यात आले. तीन वर्षापूर्वी म्हणजे 2020 मध्ये असाच एक व्हिडिओ वाघासह तीन बछड्यांसमवेत प्रसारित झाला होता. ते मारण्यात आल्याचे नंतर उघड झाले होते. त्या वाघांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु नंतर त्या बाबतीत फारशी प्रगती झाली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. पर्यावरणाचे अभ्यासक राजेंद्र केरकर यांनी मात्र वन खात्याचा हा दावा चुकीचा असल्याचे म्हटले आहे. म्हादईच्या खोऱ्यात वाघांचे अस्तित्व असून त्याचे पुरावे-खाणाखुणा अनेकवेळा समोर आल्या आहेत. म्हणून तर म्हादई अभयारण्य व्याघ्रक्षेत्र राखीव म्हणून जाहीर करण्याचे निर्देश यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहेत. पण त्याचे पालन सरकार करत नाही उलट त्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने हा विषय प्रलंबित आहे.