संपूर्ण ज्ञानवापी परिसराचे सर्वेक्षण नाही
हिंदू पक्षाची याचिका फेटाळली : वाराणसी न्यायालयाचा निवाडा
वृत्तसंस्था / वाराणसी
वाराणसी येथील ज्ञापवापी परिसराच्या संपूर्ण भागाचे सर्वेक्षण केले जाणार नाही, असा आदेश वाराणसीतील जिल्हा न्यायालयाने दिला आहे. संपूर्ण परिसराचे सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी हिंदू पक्षकारांनी केली होती. मात्र, ती न्यायालयाने मान्य केली नाही. ही याचिका विजय शंकर रस्तोगी यांनी सादर केली होती.
ज्ञानवापी मशीद ही हिंदूंचे शिवमंदीर पाडवून परकीय आक्रमकांनी बांधली आहे. या मशिदीच्या मुख्य घुमटाखाली 100 फूट उंचीचे भव्य शिवलिंग अस्तित्वात होते. या शिवलिंगाचे अस्तित्व शोधण्यासाठी या संपूर्ण परिसराचे सर्वेक्षण करण्याची आवश्यकता आहे. न्यायालयाने तशी अनुमती द्यावी. पूर्ण सर्वेक्षण केल्याशिवाय नेमके सत्य उघडकीस येणार नाही, असा युक्तीवाद करण्यात आला होता.
तलावाचे सर्वेक्षण आवश्यक
ज्ञानवापीच्या परिसरात एक तलाव आहे. त्याचा उपयोग पाय धुण्यासाठी केला जातो. या तलावाचे, तसेच इतर परिसराचे सर्वेक्षण होण्याचीही आवश्यकता आहे. सध्या केवळ मर्यादित भागाचेच सर्वेक्षण करण्यात आले आहे. भारतीय पुरातत्व विभागाने तलावाचे सर्वेक्षण केलेले नाही, असेही प्रतिपादन करण्यात आले.
मागणी अमान्य
वाराणसी न्यायालयाने ही मागणी मान्य केली नाही. संपूर्ण परिसराचे सर्वेक्षण करण्यात अडचणी आहेत. तांत्रिकदृष्ट्या ते योग्य ठरणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचाही विचार करावा लागणार आहे. त्यामुळे याचिकेत करण्यात आलेल्या मागण्या मान्य केल्या जाऊ शकत नाहीत. असे वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने आपल्या शुक्रवारी दिलेल्या निर्णयपत्रात स्पष्ट केले आहे.
अपील करणार
वाराणसी न्यायालयाच्या या निर्णयपत्राला अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान देण्याची घोषणा विजय शंकर रस्तोगी यांनी केली. ज्ञानवापीचे सत्य शोधण्यासाठी संपूर्ण परिसराचे सर्वेक्षण का आवश्यक आहे, हे आम्ही उच्च न्यायालयात पटवून देऊ. संपूर्ण सर्वेक्षण करण्याला विरोध असावयाचे कारण नाही. तांत्रिक अडचणी असतील तर त्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दूर केल्या जाऊ शकतात. पण सत्यशोधन हाच या सर्वेक्षणाचा मुख्य हेतू असल्याने तो साध्य करण्यासाठी संपूर्ण परिसराचेच भेदक रडारच्या साहायाने सर्वेक्षण होण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लवकरच उच्च न्यायालयात अपील केले जाणार आहे.