युट्यूबर ज्योती मल्होत्राला दिलासा नाहीच
पाकिस्तानसाठी हेरगिरीचा आरोप : 23 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी
वृत्तसंस्था/ हिसार
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप असलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राला दिलासा मिळू शकला नाही. हरियाणात हिसार न्यायालयाने सोमवारी ज्योतीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ज्योतीला आता 23 जून रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीपर्यंत तुरुंगातच रहावे लागेल. यापूर्वी 26 मे रोजी देखील ज्योतीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
ज्योतीला मागील महिन्यात पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. 33 वर्षीय युट्यूबर ज्योती पाकिस्तानी दूतावासातील कर्मचारी एहसान उर रहीम उर्फ दानिशसोबत नोव्हेंबर 2023 पासून संपर्कात होती. दानिशकडून हेरगिरीचे रॅकेट संचालित होत असल्याचा खुलासा झाल्यावर त्याला भारतातून हाकलण्यात आले होते तर पंजाब पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अन्य युट्युबर जसवीर सिंहला पाकिस्तानी हेरजाळ्याशी संबंध बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. पाकिस्तानातील माजी पोलीस उपनिरीक्षक या हेरगिरी रॅकेटचा सूत्रधार असल्याचा खुलासा जसवीरने चौकशीदरम्यान केला. माजी पोलीस उपनिरीक्षक नासिर ढिल्लोंनेच जसवीरची आयएसआय अधिकाऱ्यांशी लाहोरमध्ये गाठभेट घालून दिली होती. ढिल्लों पाकिस्तानी युट्यूबर आहे.
जट्ट रंधावाशी कनेक्शन
ज्योती आणि जसवीर दोघांचे प्रकरण पाकिस्तानात सक्रीय हँडलर शाकिर उर्फ जट्ट रंधावाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. जसवीर हा जट्ट रंधावाच्या संपर्कात होता आणि तो तीनवेळा पाकिस्तानात जाऊन आला आहे.