शर्मिष्ठा पनोली यांना दिलासा नाही
कोलकाता उच्च न्यायालयात पुढे सुनावणी होणार
वृत्तसंस्था / कोलकाता
पुणे येथे कायद्याचे शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी शमिष्ठा पनोली यांच्या जामीन अर्जावर कोलकाता उच्च न्यायालयात 5 जूनला पुढची सुनावणी होणार आहे. त्यांना इस्लाम धर्म आणि प्रेषित मोहम्मद यांच्यासंदर्भात कथित अवमानजनक आशय प्रसिद्ध करण्याच्या आरोपात कोलकाता पोलिसांनी अटक केली आहे. पनोली यांना हरियाणातील गुरुग्राम येथून अटक करण्यात आली.
त्यांच्या जामीनासाठी कोलकाता उच्च न्यायालयात याचिका सादर करण्यात आली आहे. या याचिकेवर प्राथमिक सुनावणी मंगळवारी करण्यात आली. पनोली यांनी त्यांची कथित पोस्ट काढून टाकली असून क्षमायाचनाही केली आहे, हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. मात्र, भारतात अनेक धर्मांचे लोक राहतात. त्यामुळे धर्मासंबंधी विचार व्यक्त करताना अधिक दक्षता बाळगली पाहिजे, अशी टिप्पणी न्यायालयाने केली. तसेच या प्रकरणातील पोलीस डायरी न्यायालयाला सादर करा, असा आदेश कोलकाता पोलिसांना देण्यात आला.
अंशत: दिलासा
कोलकाता उच्च न्यायालयाने जामीनासंबंधी अद्याप निर्णय दिला नसला, तरी पनोली यांच्यावर कोलकात्यातील गार्डन रीच पोलिसस्थानक कार्यकक्षेच्या बाहेरच्या कोणत्याही तक्रारींवर कारवाई करु नये, असा आदेशही दिला आहे. हा पनोली यांना अंशत: दिलासा आहे, असे मानण्यात येत आहे. जो पर्यंत त्यांच्या जामीनावर कोलकाता उच्च न्यायालय अंतिम निर्णय देत नाही, तोपर्यंत त्यांच्या विरोधातील कोणत्याही तक्रारीवर कारवाई करु नये, असा आदेशही देण्यात आला आहे. पनोली यांच्याविरोधात अनेक राज्यांमध्ये तक्रारी सादर करण्यात आल्या आहेत. कोलकाता उच्च न्यायालयाने ही प्रकरण प्रायमरी म्हणून नोंद पेले आहे.
केस डायरीनंतर निर्णय
कोलकाता पोलीसांनी या प्रकरणाची पोलीस डायरी 5 जूनला सादर करावी. ती पाहिल्यानंतर न्यायालय पुढील सुनावणी करेल. पनोली यांच्या विरोधात ज्या अन्य तक्रारी सादर करण्यात आल्या आहेत, त्यांच्यासंबंधी विचारही पोलीस डायरी पाहिल्यानंतरच करण्यात येईल, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
अटक बेकायदा असल्याचा युक्तीवाद
पनोली यांना झालेली अटक बेकायदा असल्याचा युक्तीवाद त्यांच्या वकीलांनी केला आहे. त्यांच्या विरोधातील एफआयआरमध्ये अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना थेट अटक करता येत नाही. त्यांना आधी नोटीस देणे पोलिसांसाठी बंधनकारक आहे. मात्र, हे नियम पाळण्यात आलेले नाहीत, असा युक्तीवाद करण्यात आला. मात्र, अटक होण्याची शक्यता असल्याने पनोली यांनी पुणे सोडले आणि गुरुग्रामला पळ काढला. त्यामुळे नोटीस काढली असूनही ती देता आली नाही, असे प्रत्युत्तर सरकारी वकीलांनी दिले. पोलिसांनी नेमके कोणते गुन्हे नोंद केले आहेत, हे पाहण्यासाठी न्यायालयाने स्टेशन डायरीची मागणी केली आहे. त्यानंतर या प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.
राजकीय आरोप-प्रत्यारोप
या प्रकरणाला आता राजकीय रंगही प्राप्त झाला आहे. भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. या प्रकरणातल्या आरोपी युवतीचा पश्चिम बंगालशी कोणताही संबंध नसतानाही या राज्यातील पोलिसांनी त्यांना अटक केली. पश्चिम बंगालमध्ये हिंदू धर्माची येथेच्छ बदनामी चाललेली असताना ती खपवून घेतली जाते. संबंधितांवर कोणतीही कारवाई होत नाही. मात्र, मुस्लीमांना खूष ठेवण्यासाठी पनोली यांच्या प्रकरणात त्वरित कारवाई केली गेली. यावरुन ममता बॅनर्जी यांच्या सरकारचा दुटप्पीपणा आणि पक्षपाती वृत्ती दिसून येते, असा प्रत्यारोप भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.