धिरयोतील रेड्याची, गोठ्याची पशुसंवर्धन खात्यात नोंद नाहीच
धिरयोमुळे जेनिटो वाझ मृत्यू प्रकरण : कायद्याचीदेखील पायमल्ली
मडगाव : जेनिटो वाझला गोठ्यात रेड्याने शिंग खुपसल्याचा दावा त्याचे कुटुंबीय करीत असले तरी त्या गोठ्याची व रेड्याची पशुसंवर्धन खात्यात नोंद झालेली नाही. त्यामुळे त्या गोठ्याला व रेड्याला मालक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारने चार-पाच महिन्यापूर्वी एक नवा कायदा केला असून त्याअंतर्गत गुरे पाळणाऱ्यांना गोठा व गुरांची सरकार दरबारी नोंद करणे सक्तीचे आहे, मात्र या कायद्याचीदेखील याप्रकरणात पायमल्ली झाली आहे. मंगळवारी फॉरेन्सिक पथकाबरोबरच पुशवैद्यकीय डॉक्टरने जेनिटोच्या कुटुंबियांनी दावा केल्याप्रमाणे, गोठ्याची व रेड्याची पाहणी केली होती. त्यात या गोठ्याची व रेड्याची पशुसंवर्धन खात्यात अधिकृत नोंदणी झालेली नसल्याचे स्पष्ट झाले.
गुरांची नोंदणी करताना गुरांच्या कानाला एक ‘चिप’ बसविली जाते. गुरांचे मालक असलेल्या व्यक्तीच्या आधारकार्डला ही चिप लिंक केली जाते. त्यामुळे गुरांचा मालक कोण हे या चिपद्वारे स्पष्ट होत असते. राज्यात पशुसंवर्धन खात्याने अशा प्रकारे गुरांची व गोठ्यांची नोंदणी करण्यावर भर दिलेला आहे. धिरयोत जेनिटोचा बळी गेला असताना देखील कुटुंबियांनी त्याला गोठ्यात गुरांना खावड देत असताना शिंग खुपसल्याचा दावा केला होता. जेनिटोचा भाऊ तसेच वॉरन आलेमाव यांनीही जेनिटोला गोठ्यातच रेड्याने शिंग खुपसल्याचा दावा केला होता. धिरयो संदर्भात जो व्हिडिओ व्हायरल झाला होता. तो जेनिटोच्या मृत्यूशी संबंधित नसल्याचा दावा ही वॉरन आलेमाव यांनी केला होता. मात्र, फॉरेन्सिक पथकाला रेड्याच्या शिंगावर तसेच गोठ्यात रक्ताचे डाग अढळून आले नव्हते. त्याचबरोबर धिरयोचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यातून सत्य परिस्थिती उघड झाली होती.
अगोदर नावेलीत, नंतर बाणावलीत
सोमवारी अगोदर नावेली मतदारसंघात धिरयोचे आयोजन झाले होते. त्यानंतर बाणावलीत धिरयो आयोजित केल्या होत्या. या दोन्ही धिरयो अनेकांनी पाहिल्या होत्या. बाणावली येथे धिरयोत जेनिटो वाझ याचा बळी गेला हा दुर्दैवी प्रकार असल्याच्या प्रतिक्रियाही त्यांच्याकडून व्यक्त होत आहे. हनुमंत परब हे ‘डिस्ट्रिक्ट सोसायटी फॉर प्रिव्हेंशन ऑफ व्रुएल्टी टू एनिमल्स’चे धिरयोसाठी नियुक्त केलेले नोडल अधिकारी आहेत. त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, बाणावली येथे अवैध धिरयो आयोजित केल्या होत्या व त्यात जेनिटो वाझ याला रेड्याने शिंग खुपसल्याने मृत्यू आला. लेखी तक्रार करण्यापूर्वी त्यांनी आपल्या मोबाईलवरून कोलवा पोलिसांकडे संपर्क साधला असता, जेनिटोला रेड्याने शिंग खुपण्याची घटना गोठ्यात घडल्याची माहिती दिली होती.