भारतीय सैन्यात तुमच्यासाठी स्थान नाही!
सर्वोच्च न्यायालयाने ख्रिश्चन लष्करी अधिकाऱ्याला फटकारले
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गुरुद्वारात पूजा करण्यास नकार दिल्याबद्दल सेवेतून काढून टाकण्यात आलेल्या ख्रिश्चन लष्करी अधिकाऱ्याने दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने ख्रिश्चन लष्करी अधिकाऱ्याला कडक शब्दात फटकारले. भारतीय सैन्यात शिस्तीला महत्त्व असल्याने कोणतेही आदेश पाळणे योग्य आहे. मात्र, तुम्ही आदेशाचे उल्लंघन केल्याचे दिसून येत असल्याने भारतीय सैन्यात तुमच्यासाठी स्थान नसल्याची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.
गुरुद्वाराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यास नकार देणाऱ्या एका ख्रिश्चन लष्करी अधिकाऱ्याच्या निलंबनाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी कायम ठेवला. यावेळी सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने एक महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. लष्कर ही एक संस्था म्हणून धर्मनिरपेक्ष आहे आणि लष्करी शिस्तीशी कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले. याचवेळी तो एक उत्कृष्ट अधिकारी असू शकतो, परंतु तो भारतीय सैन्यासाठी अयोग्य आहे. आपल्या सैन्यावर सध्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या पाहता अशी वृत्ती सहन केली जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने पुढे म्हटले आहे.
सॅम्युअल कमलेशन हे तिसऱ्या कॅव्हलरी रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट होते. तथापि, त्यांनी गुरुद्वारात पूजा करण्यासाठी जाण्याच्या त्यांच्या वरिष्ठांच्या आदेशाला नकार दिला होता. त्यांनी आपला ख्रिश्चन धर्म हे मान्य करत नसल्याचे कारण पुढे करत पूजना करण्यास नकार दिला होता. कमलेशन यांच्या या नकारानंतर त्यांना लष्करी शिस्तीचे उल्लंघन केल्याबद्दल सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते.
उच्च न्यायालयाकडूनही फटकार
यापूर्वी मे महिन्याच्या सुरुवातीला या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने लष्कराच्या निर्णयाचे समर्थन केले होते. कमलेशन यांना त्यांच्या वरिष्ठांच्या आदेशांपेक्षा त्यांचा धर्म जास्त महत्वाचा आहे. त्यांची ही कृती स्पष्टपणे अनुशासनहीनता दर्शवते असे संबोधत न्यायालयाने त्याला लष्करी मूल्यांचे उल्लंघन म्हटले होते. त्यानंतर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयानेही त्यांची याचिका फेटाळून लावली. न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांनी याबाबत टिप्पणी करताना माजी अधिकाऱ्याने त्यांच्या पाद्रीच्या सल्ल्याचेही पालन केले नाही असे स्पष्ट केले. जेव्हा तुमचे पाद्री तुम्हाला समजावून सांगतात, तेव्हा हाच विषय संपतो. तुम्ही तुमचे वैयक्तिक अर्थ लावू शकत नाही, विशेषत: गणवेशात असताना हे मुळीच मान्य होऊ शकत नाही, असेही त्यांनी सुनावले.