'जीबीएस’ला घाबरण्याची गरज नाही...
कोल्हापूर / इम्रान गवंडी :
अतिशय दुर्मिळ व पुण्यामध्ये थैमान घातलेल्या गिलेन बारे सिंड्रोमच्या ( Guillain Barre Syndrome ) आजाराचे दोन रुग्ण कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयामध्ये दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, हा आजार संसर्गजन्य नसल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा व राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. तसेच या आजारातून रूग्ण पूर्ण बरा होत असल्याचेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
सीपीआरमध्ये दाखल झालेल्या 2 जीबेएसची लागण झालेल्या रूग्णांवर तज्ञांकडून उपचार सुरू आहेत. एक विशेष पथक त्यांच्यावर 24 तास लक्ष ठेवून आहे. त्यांची स्थिती आहे. त्यांना लागणाऱ्या अँटीबॉडीजच्या औषधांचा साठा पुरेसा असल्याचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे यांनी सांगितले.
हा एक दुर्मिळ आजार असून हा आजार संसर्गजन्य नाही. अचानक हात, पाय व चालण्यातील त्रास किंवा कमजोरी, लकवा तसेच जास्त दिवसांचा डायरिया ही तीन लक्षणे सांगण्यात आली आहेत. मळमळणे, उलट्या, जुलाब हे समान लक्षण आहे. प्राथमिक लक्षणांमध्ये हातापायांना मुंग्या येणे, अशक्तपणा, बोलण्यास व गिळण्यास त्रास होणे यांचा आहे. केवळ पुण्यात या आजाराचे रुग्ण आढळत होते. आता कोल्हापुरातही दोघांना जीबीएसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
- जीबीएसची लक्षणे
हात आणि पाय सुन्न होणे
हात आणि पायांना मुंग्या येणे
स्नायूंची कमजोरी, श्वास घेण्यास त्रास होणे
चेहरा, डोळे, छाती आणि हातपाय यांच्या स्नायूंचा अर्धांगवायू
छातीचे स्नायू अर्धांगवायू झाल्यामुळे श्वास घेण्यात समस्या
- अशी घ्या काळाजी
पिण्याचे पाणी दूषित राहणार नाही, याची दक्षता घ्या
पाणी उकळून प्यावे,
आहारात ताजे व स्वच्छ अन्नाचा समावेश असावा.
वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा.
शिळे व न शिजलेलं अन्नाचे सेवन करू नये
नेहमी तणावमुक्त रहावे
- जीबीएसची कारणे
बहुतेक प्रकरणांमध्ये एखाद्या विषाणू किंवा बॅक्टेरिया इन्फेक्शननंतर हा आजार होत असुन शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीच शरीरातील पेशींवर हल्ला करते, असे आरोग्य विभागागाने नमुद केले आहे. बॅक्टेरियाच्या इन्फेक्शनमुळे गैस्ट्रोएंटेराइटिस होतो. काही फ्लू किंवा व्हायरल इन्फेक्शन्सनंतरही उँए ची शक्यता असते. काही दुर्मिळ घटनांमध्ये झिका-चिकनगुनिया, कोविड, लसीकरण, ऑपरेशन, एखादी मेडिकल प्रोसिजर किंवा दुखापतीनंतर उँए होण्याची शक्यता असते.
- जीबीएसने काय होते
परकीय विषाणू किंवा बॅक्टेरियांवर हल्ला करणारी शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीच आजूबाजूच्या मज्जासंस्थेवर हल्ला करते. परिणामी नसांना प्रभावीपणे सिग्नल्स पाठवता येत नाहीत. त्यामुळे शरीरातील स्नायुंचे संतुलन बिघडते.
- रूग्ण पूर्णपणे बरे
हा आजार कुठल्याही वयात कधीही होऊ शकतो. वृद्ध व पुरुषांमध्ये याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त आढळल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं (sंप्ध्) म्हंटले आहे. काही रुग्णांना पॅरालिसीस किंवा श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो, पण गंभीर स्थितीतून रुग्ण पूर्ण बरे होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
- असे आहेत उपचार
रूग्णाला अँटीबॉडीजचे औषध शरीरातील नसांद्वारे दिले जातात. काहीवेळा रूग्णला रक्तातील प्लाझ्मा थेरपीचे उपचार केले जातात. रूग्णाला श्वसनाचा त्रास जास्त असेल तर काही दिवस व्हेंटिलेटरवर ठेवले जाते. स्नायुंच्या हालचालींची क्षमता सुधारण्यासाठी फिजिओथेरपीचाही सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.
- व्हेंटिलेटर व अँटीबॉडिजचा मुबलक साठा
जीबेएसच्या उपचारासाठी सीपीआरची सर्व यंत्रणा सज्ज आहे. उपचारासाठी लागणारी अँटीबॉडिज औषधे व व्हेंटिलेटरचा मुबलक साठा आहे. वेळीच उपचाराने हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. याला लागणारे सर्व उपचार सीपीआरमध्ये मोफत केले जातात. नागरिकांनी घाबरून न जाता, लक्षणे दिसताच सीपीआर प्रशासनाशी संपर्क साधावा.
डॉ. सत्यवान मोरे, अधिष्ठाता